रत्नागिरी : बस कंडक्टर आत्महत्या प्रकरणाला वळण, भावाकडून गंभीर आरोप

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीमधील ( Ratnagiri) एसटी आगारातील कंडक्टरच्या आत्महत्या ( Sucide) प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पांडुरंग गडदे ( Pandurang Gadade) यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात आरोप केले असून, गडदे यांनी आत्महत्या केली नसून हत्याच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पांडुरंग गडदे यांच्या शरीरावर अनेक जखमासुद्धा दिसून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा एसटी आगारात मृतदेह आढळून आला होता. परंतु आपल्या भावाने आत्महत्या केलेली नसून त्याचा घातपात झाला असल्याचा दावा मृत पांडुरंग गडदे यांचे भाऊ शंकर गडदे ( Shankar Gadade) यांनी केला आहे.

त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचे म्हटलं होतं. पण रत्नागिरीत दाखल झालेल्या गडदे यांच्या नातेवाइकांनी मृतदेहाची पाहणी केली असता आणि पोलिसांकडील फोटो पाहिले असता, पांडुरंग याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर ज्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला त्यावरूनदेखील ही आत्महत्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मृत्यूसमयी जमिनीला पाय टेकलेल्या आणि निर्वस्त्र अवस्थेत दाराच्या चौकटीला फास लावल्याच्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला, असा दावा गडदे यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

काय आहे प्रकरण ?
८ नोव्हेंबरला मृत पांडुरंग गडदे नांदेड ते रत्नागिरी अशी नियोजित कामगिरी करून आले होते. आगारात आल्यानंतर व्यवस्थापकांकडे त्यांनी संपूर्ण हिशेब दिला. त्यानंतर ते आगारातील चालकांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांचे रूमचे पार्टनर पी.ए. तांदळे हे गडवे यांना उठवण्यासाठी गेले होते. रूमचा दरवाजा वाजवल्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यामुळे तांदळे यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता, पांडुरंग गडदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.