JDU च्या 6 आमदारांची BJP मध्ये एन्ट्री, जदयूने भाजपाला दिला ‘हा’ इशारा

पटणा : वृत्तसंस्था – भाजपने एनडीएमधील आपला सहकारी मित्रपक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) मोठा झटका दिला आहे. जदयूच्या सात पैकी सहा आमदारांनी (JDU MLAs) भाजपात (BJP) प्रवेश केला. यावर जदयूने तीव्र नाराजी स्पष्ट केली आहे. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी (KC Tyagi) यांनी यावर थेट प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. तसेच हे आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचे त्यागी यांनी म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेशात जदयूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. आघाडीच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नसल्याचे त्यागी यांनी म्हटलं आहे. त्यागी यांनी पटणा (Patna) येथे पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. तसेच बिहारमधील आघाडीबाबत काही वाद नसल्याचे सांगत अरुणाचलमधील घटनेचा बिहारमधील राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले.

यावेळी जदयूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी लव्ह जिहाद बाबत देखील भूमिका स्पष्ट केली. लव्ह जिहादच्या नावाखाली देशात द्वेष व फूट पाडण्याचे वातावरण निर्माण होत आहे. घटना आणि सीआरपीसीच्या तरतुदींमुळे दोन प्रौढांना एखाद्याच्या धर्माचा किंवा जातीचा विचार न करता त्यांच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते, असे त्यागी यांनी सांगितले.

त्यागी यांनी पुढे म्हटले की, बंगालच्या निवडणुकीची रुपरेषा पक्षाचे प्रभारी आणि अध्यक्ष 1-2 दिवसात निश्चित करतील. शेतकरी आंदोलनाबाबत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बिहारमधील विरोधी नेते जे शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त करत आहेत, त्यांची कुठलीच शेतकरी संघटना नसल्याचे त्यागी यांनी यावेळी सांगितले.