‘हा काही दाऊदच्या बायकोने केलेला मला फोन नाही’, भाजप नेत्याची टोलेबाजी

मुक्ताईनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन आले. ही बाब गंभीर असल्याची चिंता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.तसेच हा काही नाथाभाऊंना दाऊदच्या बायकोने फोन केला, असा गंमतीशीर विषय नसून याची गंभीर दखल घेऊन चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धमकीचे फोन येणे ही गंभीर बाब असून मुख्यमंत्र्यांना जर धमकी देण्याचे धारिष्ट्य करत असेल तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान आहे. त्यामुळे सरकार समोर एक आव्हान आहे की हा फोन करणारा कोण आहे. कोणत्या कारणासाठी त्यांनी फोन केला यातील गंभीरता किती आहे हे समाजासमोर लवकरात लवकर आले पाहिजे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना व शरद पवार यांना अशाप्रकारे फोन आल्याने संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ होतो. यातील तथ्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ही अस्वस्थता दूर होणार नाही. खरंतर हा खोडकर पणा करण्याचा प्रयत्न असेल, परंतु सहजासहजी हा प्रकार घेता येणार नाही. तो काही नाथाभाऊंना दाऊदच्या बायकोने फोन केला अशा पद्धतीचा गंमतीचा प्रयोग नसावा त्यात काहीतरी गंभीरता असेल, याची खात्री करणे गरजेचे आहे. कारण सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.