14 रुपयांना कोथिंबीर विकून ‘सेल्समन ऑफ द ईयर’ बनलेला ‘हा’ तरूण भाजी विक्रेता नसून आहे मराठी कलाकारच (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमध्ये एका भाजी विकणाऱ्या तरुणाची सोशल मीडियावर खूपच चर्चा होताना दिसत आहे. पाहता पाहता अनोख्या अंदाजात गाणं गात आणि डान्स करत भाजी विकणाऱ्या या तरुणाचे व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हा तरूण सोशल मीडियावर सेल्समन ऑफ द ईयर म्हणून ओळखला जाऊ लागला. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात 14 रुपयात कोथिंबरी विकणारा हा तरूण खरंच भाजी विक्रेता आहे की, आणखी कुणी, त्याचं नाव काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

अनोख्या अंदाजात भाजी विकून सोशल मीडियावर चर्चेत येणाऱ्या या तरूणाचं नाव रोशन शिंगे आहे. रोशन एक विनोदी कलाकार आहे. विक्रोळी येथील रहिवासी रोशन लॉकडाऊनच्या आधीच रघु 350 या आगामी सिनेमाच्या निमित्तानं पुण्यात आला होता. 19 मार्चला प्रोजेक्टचं काम सुरू होणार होतं.

लॉकडाऊन वाढल्यानं रोशन पुण्यातील आपल्या बहिणीकडे राहू लागला. मध्या काळात त्याच्या दाजींचीही नोकरी गेली. आर्थिक अडचण आणि घरखर्चात मदत करण्यासाठी त्यानं भाजी विकण्याचा निर्णय घेतला. मित्राकडून उसने पैसे घेत त्यानं या व्यवसायाला सुरुवात केली. भाजी विकण्यासाठी अनोखी शक्क लढवली. काहीशा हटके अंदाजात गाणी गात त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

रोशननं याआधी अनोळखी प्रीत या सिनेमातही काम केलं आहे. परंतु काही कारणास्तव सिनेमाची रिलीज अडकली आहे.