‘हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव’, साई जन्मस्थळावरून सत्यजित तांबेंचं विधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून शिर्डीच्या साई बाबांच्या जन्म स्थळाबाबत वाद उपस्थित केला जात आहे. आता या वादावर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भाष्य केले आहे. हा वाद केवळ आर्थिक नाही. सर्वसमावेशक देव व प्रतिकांच्या अपहरणाचा हा डाव आहे त्यामुळे साई जन्मस्थळाचा हा वाद तितका सरळ साधा नाही असे म्हणत तांबे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

सत्यजीत तांबे यांनी या वादाप्रकरणी ट्विटरवरून भाष्य केलं आहे. ‘शिर्डी विरुद्ध पाथरी हा वाद फक्त आर्थिक नाही. साईबाबा हे सर्वसमावेशक संत व देव मानले जातात. विसाव्या शतकात लोकांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेला हा सर्वधर्मी देव आहे. बाबांनी त्यांच्या हयातीत ते कोण, कुठले याची माहिती कधीही दिली नव्हती. उलट मी सर्वांचा आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. लोकांनाही ते पटलं. मात्र, आता २१ व्या शतकात त्यांची जात, धर्म याबद्दल दावे केले जात आहेत. हे सरळ साधे प्रकरण नाही. सर्वसमावेश देवाच्या अपहरणाचा डाव आहे,’ असं तांबे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कसा सुरु झाला नेमका जन्म स्थळाचा वाद –
पाथरी हे साईंबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा अलीकडंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद सुरू झाला. साईबाबांचे जन्मस्थळ अज्ञात आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चुकीचा उल्लेख करू नये. आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी शिर्डीकरांनी केली. त्यासाठी शिर्डी बंदही पुकारण्यात आला. आता तो मागे घेण्यात आला आहे. एकूणच जन्मस्थानाबाबत सध्या सुरु झालेल्या वादाला राजकीय किनार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र सत्यजित तांबे यांनी केलेल्या विधानाद्वारे यामध्ये राजकारण होत असून याला विरोधी पक्ष अर्थात भाजप जबाबदार असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

फेसबुक पेज लाईक करा –