‘हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण’ : रूपाली चाकणकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज क्रांतीज्योती साविञीमाई फुले जयंती निमित्ताने, समताभुमी येथे साविञी शक्तीपीठ, महाराष्ट्र यांच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला.महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यामध्ये अकरा विधवा महिलांना मंगळसुञ, साडीचोळी व हळदीकुंकूचे वाण देऊन सन्मानित करण्यात आले.

पतीनिधनानंतर येणाऱ्या दुःखाला व अडचणींना बाजूला सारून, खंबीरपणे बिकट परिस्थितीत सन्मानाने जगत, समाजालाही दिशा देण्याचे काम करणाऱ्या या महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने साविञीमाईचा विचार अंगिकारण्यासारखे आहे. तसेच कोणताच राजकीय वारसा नसताना, प्रदेशाध्यक्ष या पदावर उत्तम संघटनाबांधणी व महिला सबलीकरण करणार्‍या रूपाली चाकणकर यांचा साविञी शक्तिपीठाच्या वतीने सन्मानपञ, शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सन्मानपञाचे वाचन विकास रासकर यांनी केले. “मी सावित्रीबाई फुले बोलतेय “हे एकपाञी नाटक मेघना झुझुम यांनी सादर केले,ओव्यांसाठी शांता नेवसे यांनी साथ दिली. राज्यभरातुन अनेक महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या.दशरथ कुळधरण, कमला हिंगणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी दिपक कुदळे, पोपट बोराटे व मान्यवर उपस्थित होते.