…म्हणून सुमित्रा महाजन यांचे भाजपने तिकीट कापले ; सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रचारसभा थंडावू लागल्या आहेत. इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या बाबत वक्तव्य केले. सुमित्रा महाजन यांचे लोकसभेचे तिकीट माझे कौतुक केल्यामुळे कापल्याचे त्यांनी म्हंटले.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मी विरोधातली खासदार असली तरी माझ्या संसदेतील कामगिरीचे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तोंडभरून कौतुक केले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते, परंतु माझे कौतुक केल्यामुळे त्यांचे लोकसभेचे तिकीट कापले गेले’. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले आहे.

आपल्या मतदारसंघातील नागरिक सध्या शिक्षण आणि रोजगारासाठी बाहेरच्या देशात जात आहेत. त्यांच्यासाठी हक्काचं पासपोर्ट ऑफिस आपण उभं केलंय. आणि मी तुम्हांला शब्द देते पुढच्या पाच वर्षात प्रत्येक तालुक्यात एक पासपोर्ट कार्यालय उभं करेन. असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना दिले.

विकास कामांवरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टिकेला उत्तर देताना सुप्रिया सूळ म्हणाल्या, ‘ हे लोक बारामतीत येऊन आपल्यावर आरोप करतात, की यांनी बारामतीच्या बाहेर विकास केला नाही. जरा यांना इंदापूरला येऊन एमआयडीसी आणि कारखाने बघायला सांगा, मग यांना विकास काय असतो ते कळेल. भिगवणला पाण्याचं प्रमाण रोज कमी होत चाललंय. बोरी ला जेव्हा गारपीट झाली तेंव्हा यांच्यातलं कोण आलेलं दिसलं का? वरकुट्यात जेव्हा डाळिंबांवर रोग पडला तेव्हा कुठं होती हे लोक? तेव्हा येथील जनतेच्या पाठीमागे फक्त काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी होती. असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले .

इंदापूर येथे आज महाआघाडीची प्रचारसभा पार पडली या सभेला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार , दत्तामामा भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.