‘अजित पवार मुतऱ्या थोबाडाचे’ : ‘या’ नेत्याने केली जळजळीत टीका

मुंबई पोलीसनामा आॅनलाईन-राजकारणी लोकांचे पातळी सोडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले की, निवडणुका येत आहेत हे समजते. अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांच्यावर आजच्या सामनामधून अतिशय शेलक्या शब्दात टीका झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना काडीमात्र किंमत नाही. केवळ काकांच्या पुण्याईमुळेच ते आजवर तरले आहेत अशा शब्दात त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. इतकेच नाही तर कळस म्हणजे ‘खोपडी रिकामी असून ते एक गटारी किडा आहे.

गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही’, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेनेने अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. अयोध्येत राम मंदिराला विरोध करणं हेच अजित पवारांचं धोरण आहे. इतकंच नाही तर त्यांनी प्रभू श्रीरामाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरुन अजित पवार यांनी टीका केली होती. पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार ?, असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर टीकास्त्र सोडण्यात आले.

अजित पवारांची प्रतिक्रिया

शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती इतकेच नाही तर शिवसेनेला इतक्या मिरच्या का झोंबल्या ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विनाशकाले विपरीत बुद्धी असा उल्लेख करत अजित पवार यांनी सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी काय उल्लेख होता सामन्यात ?

अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या छंदाविषयी टोला लगावला होता. यावर उद्धव ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिले होते, याची आठवणही अग्रलेखात करुन देण्यात आली. ‘या महाशयांनी एकदा आमच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. पण आम्ही आमचे छंद उघडपणे लोकांसमोर जोपासू शकतो. आम्ही आमच्या पंढरीची वारी, शिवरायांचे गडकोट किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचे जे छंद जोपासले आहेत ते उघडपणे करू शकतो. पण अजित पवार त्यांच्या छंदाचे प्रदर्शन उघडपणे करू शकतील का ?. या गटारी किड्याचे नेमके काय छंद आहेत व त्या छंदांसाठी त्याने साताऱ्यात काय रेशमी उद्योग सुरू केले त्याविषयीची सखोल माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले देऊ शकतील, असे शिवसेनेने म्हटले आहे.