नवऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप वर हा मेसेज पाठवून घेतला गळफ़ास 

सातपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आत्महत्या हा गुन्हा असला तरी याची संख्या आज प्रचंड वाढली आहे. आणि महिलांमध्ये तर याची संख्या अधिकच आहे. सतत च्या घरगुती भांडणाला कंटाळून पतीच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवत घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सोमवारी दि. ३१ सातपूरला तिरडशेत येथील भावले मळ्यात उघडकीस आली.
याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अक्स्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नीलिमा उमेश भावले वय २६ असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उमेश सुकदेव भावले यांनी तक्रार दिली आहे. उमेश हा सकाळी नेहमीप्रमाणे कामावर असताना नीलिमा हिचा व्हॉट्सअ‍ॅप वर ‘मला त्रास होतो.

मला माफ कराल का’ व ‘सॉरी’ असा मेसेज आला. भावले यांनी पत्नीला ‘त्रास करून घेऊ नको, मी लगेच घरी येताे’ असा संदेश पाठवला. त्यानंतर घरी गेले असता बेडरूमचा दरवाजा आतून बंद असल्याने पत्नीला आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. दरवाजा उघडत नसल्याने भाऊ संदीप भावले यास बोलवून बेडरूमच्या दरवाजाची कडी तोडून दरवाजा उघडला असताना नीलिमाने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नीलिमाने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.