…. म्हणून भुजबळ ही पाहणार ‘हा’ सिनेमा 

औरंगाबाद ; पोलीसनामा ऑनलाईन- बहुचर्चित ठाकरे चित्रपटाची वाट सगळेच बघतायेत मग छगन भुजबळ ही त्यातून सुटले नाही. ”शिवसेनेत असतांना पंचवीस वर्ष बाळासाहेबांना मी खूप जवळून पाहिलंय, त्यांच्या सोबत राहिलोय. आता त्यांच्या जीवनावर ‘ठाकरे’ चित्रपट येतोय, यात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका कशी बजावली हे पाहण्याची उत्सूकता आहे. त्यामुळे परिवर्तन यात्रा आणि इतर कार्यक्रमातून सवड काढून ‘ठाकरे’ पाहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी येथे सांगितले.

आपल्या राजकीय जीवनातील पंचवीस वर्ष शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपण ‘ठाकरे’ पाहणार असल्याचे सांगितले. भुजबळ म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय जीवन, शिवसेनेच्या उभारणी दरम्यान झालेली आंदोलन, प्रसंग एका चित्रपटात दाखवण शक्‍य नाही. त्यामुळे या चित्रपटात नेमके कोणते प्रसंग दाखवले गेले, नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका कशी साकारली हे मला पहायचंय.” बाळासाहेबांना तुम्ही अटक केली, तो प्रसंग यात असेल का?

या प्रश्‍नावर ते म्हणाले, “मला माहित नाही. पण मी गृहमंत्री असतांना त्या काळातल्या ज्या फाईली पोलीसांनी माझ्यासमोर कारवाईसाठी ठेवल्या होत्या, त्यापैकीच एक बाळासाहेबांची फाईल होती, त्यामुळे सगळ्याच फायलींवर मी सह्या केल्या होत्या. बाळासाहेब आणि माझ्यात त्यानंतर शाब्दिक युध्द देखील झाले होते.” पण नंतरच्या भेटी आणि चर्चेने आमच्यातील कटुता नाहीशी झाली होती,अशी आठवणही छगन भुजबळांनी सांगितली.

”शिवसेनेत असतांना बेळगांवच्या आंदोलनात मी वेश बदलून सीमाभागात घुसलो होतो. अटक झाली, जेलमध्ये गेलो, डोक फुटलं. मुंबईत दाक्षिणात्यांच्या विरोधात उभारलेले आंदोलन ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’चा नारा हा त्याकाळातील परिस्थीतीनुसार होता. त्यामुळे हा प्रसंग चित्रपटात घेतला असावा किंवा नाही, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही,” असेही भुजबळांनी स्पष्ट केले.