पुलवामा हल्ला : 61000 KM ची यात्रा पुर्ण करून महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तीनं घेतली 40 शहीदांच्या कुटूंबियांची भेट, एकत्र केली स्मशानातील ‘माती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी आजच्याच दिवशी पुलवामा हल्ला झाला होता आणि त्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. आज श्रीनगरच्या सीआरपीएफच्या लेथपोरा कॅंपस्थित स्मारकात शहीद झालेल्या 40 जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील उमेश गोपीनाथ जाधव हे या समारोहाचे विशेष मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. उमेश जाधव यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटूंबांना भेटण्यासाठी जवळपास 61000 किमीचा प्रवास केला. यावेळी उमेश गोपीनाथ जाधव यांनी शहीद झालेल्या जवानांच्या स्मशान भूमीवर जाऊन त्यांच्या आठवणीत तयार करण्यात आलेल्या स्मारकाजवळील माती जमा करुन येथे आणली होती.

जाधव म्हणाले की मला गर्व आहे की मी पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटूंबाला भेटू शकलो आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. आई वडीलांनी आपली मुलं गमावली, पत्नीने आपला पती गमावला, मुलांनी आपले वडील गमावले, मित्रांनी आपला मित्र गमावला. मी त्यांच्या घरुन आणि स्मशान भूमीवरुन तेथील माती जमा केली आहे.

सीआरपीएफच्या जवानांच्या आठवणीत 40 शहीद जवानांच्या लेथपुरा कॅंम्प परिसरातील स्मारकांचे उद्घाटन करण्यात आले. CRPF ने ट्विट केले की तुमच्या शौर्याचे गीत कर्कश आवाजात विलीन झाले नाही. गर्व याचा आहे की आम्ही रात्रभर रडलो नाही. सीआरपीएफकडून पुढे लिहिण्यात आले आहे की आम्ही आमच्या त्या बांधवांना सलाम करतो ज्यांनी पुलवामामध्ये देशाची सेवा करत प्राणाची आहुती दिली, आम्ही अद्याप ते विसरलो नाही. आम्ही आपल्या शूर शहीदांच्या कुटूंबासोबत आहोत.