Corona : ICU मधील ‘हा’ हृदय पिळवटून टाकणारा फोटो जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

पोलिसनामा ऑनलाइन – हा दिवस होता अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हींगचा (एकमेकांचे आभार मानण्याचा हा दिवस). अमेरिकेतील टेक्सासमधील एका कोरोना विशेष रुग्णालयामध्ये डॉ. जोसेफ व्हॅरॉन हे सलग २५२ दिवशी कामासाठी उपस्थित राहिले. त्यांना रुग्णालयातील आयसीयूमध्ये एक वयस्कर व्यक्ती निराश होऊन, चेहरा पाडून बसलेले दिसले. डॉ. जोसेफ यांनी पीपीई कीट घातले. ते रुग्ण सेवेसाठी तयार झाले. ते थेट आयसीयूमध्ये जाऊन या वयस्कर व्यक्तीला मिठी मारली. हा क्षण एका फोटोग्राफरने आपल्या कॅमेरात कैद केला आणि तो जगभरात व्हायरल झाला.

डॉ. जोसेफ हे ह्युस्टन येथील युनायटेड मेमोरियल मेडिकल सेंटरचे प्रमुख आहेत. डॉ. जोसेफ यांनी यासंदर्भात सीएनएनला माहिती देताना म्हणाले , “मी जेव्हा करोना आयसीयूमध्ये प्रवेश करत होतो तेव्हा मला ही वयस्कर व्यक्ती दिसली. ही व्यक्ती आपल्या बेडवरुन उठून आयसीयूच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. मला पाहताच या व्यक्तीला रडू आलं. मी नंतर त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना तुम्ही का रडत आहात असं विचारलं. रडत रडतच त्या व्यक्तीने, “मला माझ्या पत्नीसोबत रहायचं आहे,” असं म्हटलं. ते शब्द ऐकल्यानंतर डॉ. जोसेफ यांनी या व्यक्तीला मिठी मारली. “मला त्यांच्या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटलं. मी ही त्यांचं बोलणं ऐकून एकदम दु:खी झालो. मी मिठी मारुन धीर दिल्यानंतर त्यांचं रडणं थांबलं,” “मला या साऱ्या प्रसंगामुळे रडू का आलं नाही ठाऊक नाही. मात्र माझ्या सोबतच्या नर्स रडू लागल्याचे मी पाहिले,”

वयस्कर व्यक्तींना होणाऱ्या त्रासासंदर्भात भाष्य करताना जोसेफ म्हणाले, की करोनाच्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये राहणं फार कठीण जातं. अनेकदा वयस्कर व्यक्तींना असं एकटं रहाणं खूपच कठीण जातं. म्हणजे तुम्ही विचार करुन बघा की तुम्ही अशा एका रुममध्ये आहात की जिथे लोकं स्पेससूट घातल्याप्रमाणे कपडे घालून येतात. त्यातच रुग्ण वयस्कर असेल तर त्याला हे सारं फार कठीण जातं कारण त्याला एकटेपणा अधिक जाणवतो. त्यांच्यापैकी काहीजण रडतात तर काही पळून जाण्याचा प्रयत्न करतात. आमच्याकडे एकाजणाने तर खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, व्हायरल झालेल्या फोटोमधील वयस्कर व्यक्ती आता सावरली आहे, अशी माहिती जोसेफ यांनी दिला. काही दिवसांमध्येच ते ठणठणीत बरे होऊ स्वत:च्या घरी जातील असा आम्हाला विश्वास आहे, असं जोसेफ यांनी आठवडाभरापूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

जोसेफ यांनी मुलाखतीमधून दिला संदेश

. “लोकं सध्या बार, हॉटेल आणि मॉल्समध्ये फिरत आहेत. हा वेडेपणा आहे. लोकं नियम आणि सुरक्षेसंदर्भातील गोष्टी ऐकत नाही आणि मग आमच्या रुग्णालयामध्ये आयसीयूत दाखल होतात. मला लोकांना अशा परिस्थितीमध्ये मिठी मारण्याची इच्छा नक्कीच नाहीय. त्यामुळेच लोकांना किमान गोष्टींचं पालन करावं. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं, हात वारंवार धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे यासारख्या गोष्टींचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. लोकांनी एवढं केलं तरी आमच्यासारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांना थोडा आराम करता येईल. ”