सोशल मीडियावर ‘अ‍ॅक्टिव्ह’ असणाऱ्यांना ‘या’ कंपनीकडून मिळणार ‘कर्ज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आता तुमचे सोशल मीडिया अकाउंट तुम्हाला कर्ज मिळवून देऊ शकते. आश्चर्य वाटले ना, पण हे खरं आहे. पुण्यातील एक तीन वर्षांची स्टार्टअप कंपनी सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटी पाहून लोकांना कर्ज देणार आहे. एकीकडे बँका क्रेडिट स्कोअर, बँक आकाउंट स्टेटमेंट आणि इन्कमटॅक्स रिटर्न पाहून मगच कर्ज देत असताना लोनटॅप ही कंपनी पगार आणि सोशल मीडियावरील अकाउंट पाहून लोकांना कर्ज देणार आहे.

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पुण्यातील ही स्टार्टअप कंपनी सोशल मीडियावरील अकाउंट पाहून वैयक्तिक कर्ज देणार आहे. लोनटॅपचे सहसंस्थापक आणि सीईओ सत्यम कुमार यांच्या महितीनुसार लोनटॅप हे दोन्हीचे मिश्रण आहे. म्हणजेच कंपनी काही पारंपारिक पद्धतीसह डिजिटल नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचे कर्ज घेणाऱ्याचे वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक माहितीचा शोध घेते. त्यांची सोशल मीडिया प्रोफाईल जसे फेसबुक आणि लिंक्डइन, फ्रेंडलिस्ट, अकाउंटचे लॉगेव्हिटी, राहणीमानाची माहिती आणि अ‍ॅक्टिव्हिटी ही माहिती घेतली जाते.

लोनटॅप या कंपनीचा व्यावसाय वाढत असून डिजिटल लोन मार्केटमध्ये तीन वर्षात कंपनी व्यवसाय ३३ टक्क्यांनी वाढून ४८ टक्क्यांवर गेला आहे. यावर्षी जानेवारीत लोनटॅपने पाचव्या फेरीत ५७ कोटी निधी जमवला. कंपनीने आतापर्यंत २३० कोटींचे कर्ज दिले आहे. या आर्थिक वर्षात ८०० कोटी रूपये लोन देण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनी ग्राहकांच्या सोयीनुसार कर्ज फेडण्यासाठी हप्त्याची सुविधा देते. कुमार यांच्या माहितीनुसार ग्राहकाला किती हप्ता भरणे परवडू शकते यांची माहिती घेण्याचा प्रयत्न कंपनी करते आणि त्यानुसार कर्जदाराचा हप्ता ठरविण्यात येतो.