‘या’ राज्याने घातली शाळांमध्ये ‘शिक्षक’ आणि ‘विद्यार्थ्यांच्या’ मोबाईल वापरावर ‘बंदी’

राजस्थान : वृत्तसंस्था – वर्गामध्ये मुलांनी मोबाईल फोन वापरणे ही आपल्याकडे शिक्षणव्यवस्थेतील मोठी समस्या ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुख्याध्यापकाने चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराच्या त्रासाला कंटाळून वर्गात सापडलेले सर्व मोबाईल फोन फोडून टाकल्याची घटना घडली होती. आता याबाबतीत राजस्थान सरकारने एक कठोर निर्णय घेत सरकारी शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोबाइल फोन वापरण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती राज्याचे शिक्षणमंत्री गोविंदसिंग डोटासरा यांनी दिली. ते म्हणाले की, राजस्थान सरकारने एक परिपत्रक काढले आहे, ज्यामध्ये शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मोबाइल फोन वापरावर बंदी घातली आहे. २७ ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होईल.

राजस्थानमध्ये सतत तक्रार येत होती की वर्गातील शिक्षक मोबाइल फोनचा खूप वापर करतात. या तक्रारींची दखल घेत राज्याच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले आहे. मोबाइल वापरण्यावर बंदी असूनही जर एखादा शिक्षक आपल्या वर्गात मोबाईल फोन वापरत असल्याचे आढळले तर शाळेचे प्रभारी त्यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करू शकतात असेही विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे शाळा आणि एकूणच शैक्षणिक पद्धतीत शिस्तबद्धता येईल असते मत व्यक्त होत आहे. शिक्षक आणि विध्यार्थी अशा दोघांच्याही वापरावर बंदी घातली जाणार असल्याने शिक्षक संघटनांकडून यावर नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. परंतु एकंदरीतच या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे दिसत आहे.

हरियाणानेही घातली होती बंदी :
यापूर्वी सन २०१७ मध्ये हरियाणाच्या सरकारी शाळांमध्येही शिक्षकांना वर्गात मोबाइल फोन नेण्यास बंदी घातली होती. ऑर्डरमध्ये असे म्हटले होते की लेखन कार्यासाठी तुम्हाला मोबाईल घेऊन जायचे असेल तर त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विशेष परवानगी घेऊन नोंद करावी लागेल.

Visit : Policenama.com