राम मंदिर तर सोडाच, महाराष्ट्रातील ‘हे’ ही मंदिर धोक्यात 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या अवास्तव बांधकामामुळे वास्तूला धोका निर्माण झाला आहे. हे सगळे चुकीचे बांधकाम पाडून ते व्यवस्थितरित्या बांधलं तर मूर्ती अनंत काळ जगेल असा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज केला आहे.
विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अस्ताव्यस्त बांधकामे यामुळे छतावरील ताण वाढला आहे. त्यामुळे मूळ मंदिर वास्तूस धोका निर्माण झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. आता संपूर्ण मंदिराचे ऑडिट करायचे काम पुरातत्व विभागाने हाती घेतलं आहे. यानंतर नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल ते मंदिर समितीपुढे ठेवणार आहेत. राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक विलास वहाणे आणि त्यांच्या टीमने आज विठ्ठल मंदिराची पाहणी केली.

मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडले ! 

मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असल्याने त्यात यादवकालीन शिल्पाचे साम्य आहे असे दिसून येते. यानंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले आहे असा अंदाज पुरातत्व विभागाला वाटतो. यानंतरच्या काळात मात्र मंदिराच्या छतावर भरभक्कम स्लॅब टाकण्यात आल्याने मंदिरावर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. यातच हवा खेळण्यासाठी मंदिराच्या छतावरील अनेक ठिकाणाची जुनी दगडे काढून तेथे हवा बाहेर जावी म्हणून मोठ्या आकाराची छिद्रे केली होती त्यामुळे वास्तूचे छत कमकुवत झाले आहे.
गाभाऱ्यात अनेक ठिकाणी मूळ वास्तू सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकल्याने आता हे सर्व पूर्ववत करावे लागेल, असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. याबाबत तातडीने संपूर्ण मंदिराचे ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेत असून हा अहवाल समितीसमोर ठेवला जाणार आहे. मात्र विठ्ठल मंदिर हे केंद्र आणि राज्य यापैकी कोणत्याच पुरातत्व विभागाच्या यादीत  नसल्याने अशा पद्धतीची धोकादायक आणि मारक बांधकामे होत आली आहेत. आता या संपूर्ण मंदिराचा ताबा राज्य सरकारचा झाल्यावर तरी हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.