गाढवाची विष्ठा आणि ॲसिडपासून बनविला जात होता मसाला, पोलिसांनी टाकला छापा, 300 किलो बनावट मसाले जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये भेसळयुक्त अन्नाशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी मंगळवारी येथे एका मसाल्याच्या कारखान्यावर छापा टाकला आहे, त्यात असे आढळले की, गाढवाची विष्ठा , गवत, बनावट रंग आणि ॲसिडच्या सहाय्याने बनावट मसाले येथे तयार केले जात होते. चाचणीसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मसाले पाठवले आहेत. चाचणीनंतर कारखान्याच्या मालकाविरूद्ध अन्न सुरक्षा व मानक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी कारखान्यातून 300 किलो बनावट मसाले जप्त केले आहे.

हाथरस जिल्ह्यातील नवीपूर भागात लाल मिरचीची पूड, गरम मसाला, कोथिंबीर, हळद आणि इतर मसाले पोलिसांना आढळले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हे मसाले धोकादायक आणि खाद्यान्न नसलेल्या वस्तूंच्या मदतीने तयार केले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याचे मालक अनूप वर्षाने यांना अटक करण्यात आली असून कारखाना सील करण्यात आला आहे.