‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर यंदाची वारी परंपरेपुरती !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या वर्षीचा आषाढी वारी पालखी सोहळा केवळ प्रथा, परंपरेचा भाग जपत साजरा केला जाणार असून या सोहळ्याचे स्वरूप आणि दक्षतेबाबत लवकरच शासनाशी चर्चा करणार असल्याचे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज यांनी सांगितले. आषाढी यात्रा आणि पालखी सोहळयाच्या आयोजनाबाबत या सोहळ्यातील प्रमुखांची बुधवारी दूरचित्र संवादाद्वारे एक बैठक पार पडली.

वारीची परंपरा खंडित न होता ती राखली जावी म्हणून यंदा तिचे स्वरूप बदलण्याचे या बैठकीत ठरले आहे. याबाबत शासनाशी चर्चा करत याला अंतिम रूप देण्यात येईल, असे वासकर महाराज यांनी सांगितले. तत्पूर्वी मानाच्या सर्व पालखी सोहळा आयोजकांकडूनही सूचना मागवण्यात येणार असून हा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे. शासनाशी चर्चा करण्यासाठी समन्वय समितीचीही स्थापना केली जाणार आहे.

पालखी सोहळयात मर्यादित लोकांचा सहभाग, या लोकांनीही ‘सामाजिक अंतर’ ठेवत पालखी नेणे, मुखपट्टया लावून वारक र्‍यांनी सहभागी होणे, सोबत वैद्यकीय पथक ठेवणे, पुण्यासारख्या महानगरातून हा सोहळा न जाता तो शहराबाहेरून नेण्याच्या मार्गाचे नियोजन करणे, आदी मुद्दयांवर सहमती झाल्याचे वासकर महाराज यांनी सांगितले.