‘कोरोना’वर मात करणारे ‘हे’ आहे देशातील सर्वात वयोवृद्ध दाम्पत्य !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनावर मात करीत केरळमधील वयोवृद्ध दाम्पत्यांनी लढाई जिंकली आहे. तब्बल 25 दिवस त्यांनी कोरोनाविरोधात लढा दिला आहे. 93 वर्षीय थॉमस अब्राहम आणि 88 वर्षीय त्यांची पत्नी मरियम्मा यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणारे हे देशातील सर्वात वयोवृद्ध दाम्पत्य आहे. थॉमस आणि मरियम्मा यांना मुलापासून संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना कोट्टायम येथील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

थॉमस आणि मरियम्मा यांनी 25 दिवस लढा दिला. कोट्टायम सरकारी मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी सांगितले की, थॉमस आणि मरियम्मा दाम्पती कोरोनापासून मुक्त झाले असून ते आता तंदुरुस्त आहेत. रुग्णालयातून सोडण्यापूर्वी दोघांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून तज्ज्ञांनी याला चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे.

थॉमस आणि मरियम्मा यांना ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) आणि मधुमेहाचा आजार होता. वाढत्या वयामुळे दोघांची रोग प्रतिकारक क्षमताही (इम्यून सिस्टम) खूप कमी झाली होती. यामुळे थॉमस आणि मरियम्मा यांची प्रकृती पहिल्यापेक्षा जास्त खालावली होती. पण व्यवस्थित देखभाल आणि उच्च प्रतिच्या उपचारामुळे हे दाम्पत्य कोरोनामुक्त झाले. थॉमस आणि मरियम्मा यांचा मुलगा इटलीवरुन भारतात परतला होता. मुलाच्या संपर्कात आल्यामुले दोघांनाही बाधा झाली होती.