‘त्या’ 2 महाविद्यालयीन युवकांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी केली गावठी पिस्तुले, काडतुसांची विक्री ! स्वारगेट पोलिसांकडून पर्दाफाश

स्वारगेट : पोलीसनामा ऑनलाइन –  अवघ्या १५ हजारांत मिळणारे गावठी पिस्तूल दुप्पट दराने विकून झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांना, त्यांना ही पिस्तूल पुरविणार्‍या सप्लायरसह चार जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे पोलिसांनी जप्त केली. विशेष असे की, काही दिवसांपूर्वी वानवडी येथे वाळू व्यावसायिकावर झालेला गोळीबार आणि वेल्हा तालुक्यात हॉटेल व्यावसायिकावर झालेल्या गोळीबारासाठी या युवकांनीच विकलेली पिस्तुले वापरण्यात आल्याने शस्त्र पुरवठा करणारे आणि गुन्हेगारांचे सिंडीकेट शहरात मुळं पसरत असून, पोलिसांना आव्हान देत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

बारक्या ऊर्फ प्रमोद पारसे (वय १९), राजू जाधव (वय २०, रा. माणगाव, हवेली) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन युवकांची नावे आहेत, तर बल्लूसिंग शिकलीगर (रा. निमखेडी, जि. बुलढाणा) यांने त्या दोघांना पिस्तूल पुरविले होते. पारसे आणि जाधव यांनी त्यांच्याकडील चार पिस्तुले विकण्यासाठी लादेन ऊर्फ सोहेल मोदीन आसंगी (वय २२, रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव, कात्रज) याला दिली होती. स्वारगेट पोलिसांनी शिकलीगर आणि आसंगी यालाही अटक केली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर आणि झोन २ चे उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले, की मध्यंतरी वानवडी येथे एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार झाला होता. गोळीबार करणार्‍या आरोपींना पिस्तूल पुरविणारा बारक्या ऊर्फ प्रमोद पारसे हा ७ नोव्हेंबरला स्वारगेट येथील पीएमपी बस स्टॉप येथे आला असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांच्या नेतृत्वाखालील टीमने पारसे याला तेथून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे दोन गावठी पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे मिळाली.

पारसे याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचा महाविद्यालयीन मित्र असलेल्या राजू जाधव याच्या ओळखीच्या बल्लुसिंग याच्याकडून बुलढाणा येथून जवळपास १३ पिस्तुले आणि काडतुसे विकत आणली होती. या माहितीवरून पोलिसांनी जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ पिस्तुले आणि १५ काडतुसे जप्त केली. तसेच एका पथकाने बुलढाणा येथे जाऊन बल्लुसिंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त केली. पारसे आणि जाधव याने त्यांच्याकडील ४ पिस्तुले लादेन ऊर्फ सोहेल या मित्राला विक्रीसाठी दिली होती. लादेन याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी छापा मारून लादेन याला अटक करून त्याच्याकडून ३ पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे जप्त केली. त्याने एक पिस्तूल वेल्हा येथे हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार करणारा आरोपी संदीप धुमाळ याला विकले होते. धुमाळ याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश कांटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांच्या पथकाने सलग सहा दिवस विशेष परिश्रम घेत या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला.