एक कोटींचा ऐवज लंपास करणाऱ्यांना मध्यप्रदेशात अटक

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाईन 
मालक कामनिमित्त गावाला गेल्याचा गैरफायदा घेऊन, फ्लॅटचे लॅच उचकटून घरातील सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन फरार झालेल्या नोकरासह तिघांना पोलिसांनी मध्यप्रदेश येथे ताब्यात घेतले आहे. ही चोरी निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकाजवळ व्यवसायिकाच्या घरी झाली होती ती रविवारी दुपारी उघडकीस आली होती.

विनोद राजकुमार अगरवाल (48, रा. सेक्टर नंबर 23, पंचवटी बांगला, भक्ती-शक्ती चौक, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर गोविंद कालु परियार (35, रा. कलाली, लमकी, देश – नेपाळ) आणि त्याच्या दोन साथीदाराना ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल कुटुंबीय घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. गोविंद हा अगरवाल यांच्या बंगल्यामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. शनिवारी (दि 16) रात्री घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत गोविंद याने फ्लॅटचे लॅच तोडले. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, डायमंड सेट व रोख रक्कम असा एकूण 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन गोविंद व त्याचे साथीदार पसार झाले.

पोलिसांनी माहिती घेऊन तत्काळ पथके रवाना केली. रविवारी रात्री उशिरा गोविंद व त्याच्या साथीदाराना मध्यप्रदेश मध्ये रेल्वे स्थानकावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. या तिघांकडे चोरलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आलेली आहे. या चोरीचा चौघांनी एकत्र कट केला होता. त्यानंतर संधी साधुन त्यांनी चोरी केली आणि त्या किमंती ऐवजाची वाटणी केली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. चोरट्याना निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.