‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहिदांचा दर्जा द्या : IMA

दिल्ली : करोनाच्या महामारीत मार्च महिन्यांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये 24 आपली सेवा पुरविणाऱ्या अनेक डॉक्टरांचादेखील करोनाशी लढताना मृत्यू झालेला आहे, त्यांना सशस्त्र दलातील शहिदांचा दर्जा द्यावा आणि त्यांच्या घरातील सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केलेली आहे.

देशभरात गेल्या सहा महिन्यांपासून करोनाशी दोन होत करण्यात आणि रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र, यामध्ये अनेक डॉक्टरांदेखील करोनाची लागण झाली आणि दुर्देवाने काही डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकारी आकडेवारीचे संदर्भ देत आयएमएने म्हटले आहे की, आरोग्यक्षेत्रातील 87 हजार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 573 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, भारत सरकारने अधिकृतपणे ही आकडेवारी जाहीर केलेली नाही.

आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस करोना रुग्णांना वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांदेखील मोठ्या प्रमाणात करोना होत आहे. त्यात काही जणांचा मृत्यूही झालेला आहे. अशा करोनाने मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा, तसेच त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना किंवा मृत्यू पावलेल्या डॉक्टरच्या पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी द्यावी, अशा आशयाचे पत्र पंतप्रधान नरॆंद्र मोदी यांना आयएमएने दिलेले आहे.