पुण्यात सापडलेली ‘ती’ भुयारं पेशवेकालीन नाहीत : पुरातत्व विभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील स्वारगेट परिसरात मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सुरु असताना आढळून आलेली दोन भुयारं ही पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील तीन दिवसापासून ही भुयारं पेशवेकालीन असल्याची चर्चा शहरात सुरू होती.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट येथील प्रस्तावित ‘मल्टिमोडल हब’ आणि भुयारी स्टेशनचे काम सध्या सुरू आहे. पीएमपीएमएलचे बस स्थानक स्थलांतरित केल्यानंतर या ठिकाणी खोदाई सुरू असताना महामेट्रो कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दोन भुयारं सापडली. या भुयारांविषयी अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते. मात्र पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून हे पेशवेकालीन नसल्याचा निर्वाळा दिला.

पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास सहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्वारगेटजवळ भुयार असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन पुरातत्व विभागाच्या पथकाने पाहणी केली. या भुयाराचे बांधकाम विटा आणि सिमेंटच्या सहाय्याने केल्याचे दिसून आले. आतमधल्या पाईप लाईननुसार ब्रिटिश काळातील हे भुयार असल्याची शक्यता आहे. या भुयारांची माहिती घेऊन महामेट्रोला सविस्तर अहवाल दिला जाणार आहे.’

अशी आहे भुयारांची रचना –

सुमारे ५०-६० मीटर लांबीच्या या भुयारांची रुंदी तीन-साडेतीन फूट असून, उंची ८ ते १० फुटांदरम्यान आहे. या भुयारांच्या दोन्ही बाजूस दगडी भिंती असून, त्यात दोन जलवाहिन्या (पाइपलाइन) आहे. यातील एका भुयाराची बाजू सारसबागेपासून पर्वती दिशेने वळविण्यात आलेली आहे. तर दुसरी बाजू पूर्व दिशेला गुलटेकडीच्याबाजूला वळविण्यात आलेली आहे. या भुयाराची उंची साधारण १२ फुट आहे. या ठिकाणचे बांधकाम अजूनही पक्के असून, मेट्रोच्या कामामुळे त्याला कोणताही धक्का पोहोचलेला नाही.

Loading...
You might also like