Pooja Chavan Suicide Case : ज्यांच्यावर आरोप होताहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी – राजू शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेत राठोडांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यात आता या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, पूजा चव्हाण प्रकरणावरून ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र ज्यांच्यावर आरोप होत आहे ते कुठल्याही पक्षाचे असले तरी खुलासे झाले पाहिजे. चौकशी करून दोषीवर कारवाई झालीच पाहिजे. चौकशीला कुणीही विरोध करू नये, असे ते म्हणाले.

राजू शेट्टी शुक्रवारी (दि.26) पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी पूजा चव्हाण प्रकरणासह विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात महिलांवर अन्याय होत असेल तर ठोस भूमिका घ्यावी. मात्र सध्या जे राजीनाम्याची मागणी करत त्यांची भूमिका विश्वामित्रासारखीच आहे. त्यांच्या काळातही अश्या स्वरूपात आरोप झाले होते. मात्र त्यांची तोंड त्यावेळी गप्प होती. आगामी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा होणारच आहे. परंतु गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा करायला हवा असेही शेट्टी म्हणाले.

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले. उद्या अमित शाह यांचेही देतील. आपल्या मृत्युनंतर समाज आपली दखल घेणार नाही अशी भीती वाटते म्हणून ते आधीच नाव देत असल्याची टीका शेट्टी यांनी केली. तसेच हळूहळू शेतकऱ्यांची FRP थकीत होत चालली आहे. थकबाकी वाढत चालली असून ती मिळाली पाहिजे. ती मिळाली नाहीतर सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची तयारी सुरू आहे. आम्ही पैसे सोडणार नाही, असे ते म्हणाले.