नितीन नांदगावकरांच्या नावे खंडणी उकळणारे दोघे गजाआड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावाने खंडणी उकळणा-या दोघांना मुंबई पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील अंधरी पूर्व परिसरात हा प्रकार घडला आहे. बिल्डरकडून घर मिळवून देतो असे सांगत ही खंडणी घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

सुरज निकम (24) आणि रोहित कांबळे (19) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना मुंबई आणि सातारा येथून अटक केली आहे. या प्रकरणी तक्रारदाराने अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा या ठिकाणी विकी सिद्दिकी नावाचा बिल्डर आहे. या बिल्डरकडून घर घेण्यासाठी तक्रारदार संदीप यांनी बिल्डरला 18 लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे घेतल्यानंतर बिल्डर सिद्दिकीने संदीप यांना घर काही दिले नाही. बिल्डर सिद्दिकी घर देत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारदार संदीप यांनी नितीन नांदगावकर यांच्या नावाच्या फेसबूकवरील नितीन नांदगावकर फॅन क्लब या ग्रुपवर मदत मागितली. त्यानंतर या ग्रुपमधून आरोपी सुरज आणि रोहित यांनी नितीन नांदगावकर यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी केली. त्यांनी मदतीच्या बदल्यात संदीप यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपींच्या मागणीप्रमाणे संदीप यांनी या दोघांनाही दीड लाख रुपये दिले. मात्र, पैसे मिळताच त्यांनी आपला मोबाईल नंबर बंद ठेवला. त्यानंतर तक्रारदार संदीप यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी सर्व तांत्रिक तपास पूर्ण करुन सूरज निकम या आरोपीला सातारा तर आरोपी रोहित कांबळे याला मुंबईतून अटक केली आहे.