चिनी वस्तू वापरणार्‍यांना मारहाण करून त्यांच्या घरांचं नुकसान केलं पाहिजे, भाजपा नेत्याचे ‘वादग्रस्त’ वक्तव्य

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते जॉय बॅनर्जी यांनी जनतेला चिनी मालावर बंदी घालण्याचे आवहान केले. इतकचं नाही तर चिनी वस्तू वापरणार्‍यांना मारहाण करुन त्यांच्या घरी चोरीमारी करुन घरांचे नुकसान केले पाहिजे अशी टोकाची भूमिकाही बॅनर्जी यांनी मांडली आहे.

भारत आणि चीन सीमेवर गालवान खोर्‍यात मागील आठवड्यात झालेल्या हिंसेमध्ये 20 जवान शहीद झाले. यानंतर चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच आता भाजपाच्या नेत्याने थेट चिनी माल वापरणार्‍यांवर हल्ला करण्याचा अजब आवाहन केले आहे. चीनला आपण धडा शिकवला पाहिजे. या सर्वांची सुरवात आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून करायला हवी. चीनमधून येणार्‍या प्रत्येक वस्तूवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. जे अजूनही चिनी वस्तू वापरत आहेत त्यांनी अशा वास्तूंचा वापर बंद केला पाहिजे. असे न केल्यास त्यांचे पाय तोडले पाहिजे आणि त्यांच्या घरांची लूटपाट केली पाहिजे, असेही बॅनर्जी म्हणाले.

बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आधी भाजपाने चीनसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. या संकट प्रसंगी आम्ही सर्वजण सरकारबरोबर आहोत. मात्र भाजपाच्या नेत्यांनी अशी वक्तव्य करण्याआधी केंद्रात असणार्‍या पक्षाने चीन आपल्या भूभागामध्ये शिरलाच कसा याचे स्पष्टीकरण द्यावे. लोकांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकायचा असेल तर ते स्वइच्छेने टाकतील बहिष्कार. अशाप्रकारची वक्तव्य करण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला?, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने उपस्थित केला.