ज्यांना मायेचा घास दिला त्यांनी साथ सोडली नाही – सिंधूताई सपकाळ

पुणे – एवढी भूक लागायची की रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटायचे. त्याचवेळी तेव्हा माझ्याप्रमाणेच अवतीभवती अनेक भुकेले असल्याचे लक्षात यायचे. त्यांना मी घासातला घास दिला अन् माईचा प्रपंच सुरू झाला. त्यातूनच मी हजारो अनाथांची माय झाले…’ पद्मश्री जाहीर झाल्यानंतर सिंधूताई सपकाळ आपल्या भावना व्यक्त करत होत्या. ‘माझ्या लेकरांमुळेच मी जगू शकले. या लेकरांना आणि त्यांना जगविणाऱ्यांना मी हा पुरस्कार अर्पण करते,’ असे सांगायला त्या तसूभरही कमी पडल्या नाहीत.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधूताईंनी आपल्या आयुष्यातील अनेक कटू-गोड आठवणींचा पाढा लिलया वाचला. ‘वीस वर्षांचे वय आणि हातात दहा दिवसांचे बाळ असताना बेघर झाले. या काळात भीक मागितली, रेल्वेत राहिले, रात्री भीती वाटली की स्मशानात जाऊन राहायचे. ते माझ्यासाठी सर्वांत सुरक्षित ठिकाण होते. या काळात सगळ्या जगाचा फार राग आला होता. जगात पोटाची भूक सगळ्यात मोठी असते, हे कळले. भाकरीचा शोध घेतानाच, आसपास अनेक जण माझ्यासारखेच भुकेले असल्याचे लक्षात यायचे. मी ज्यांना घास दिला, ते मला कधीही सोडून गेले नाहीत. त्यातून एवढ्या लांबवरचा प्रवास घडला, अशा एक ना अनेक आठवणी त्यांनी जागवल्या.

‘माझ्या वडिलांना रडत बसलेले कधीही आवडायचे नाही. ते नेहमी म्हणायचे, ‘लढायला शिका, रडत बसू नका’. तीच ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण झाली. जन्मदात्या आईसोबतच संघर्ष करायला शिकविणाऱ्या वडिलांची आठवण येत आहे,’ असे सांगताना सिंधूताईंना भावना अनावर झाल्या होत्या. सर्वच प्रसारमाध्यमांनी माझे कार्य प्रकाशझोतात आणले, त्यातून मला प्रोत्साहन मिळत आहे, या बाबींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

अंगावर आलेल्या संकटांना न घाबरता सामोरे गेले नाही, तर त्यावर पाय देऊन उभे राहा. त्यातून संकटांची उंची कमी होते. एका रात्रीची वाट पाहा, उद्याचा दिवस नक्की तुमचा आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

– सिंधूताई सपकाळ