अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मिळणार यावर्षी दिवाळीचा बोनस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या ( Corona) या संकटानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पुढील काही दिवसांत दिवाळीचा ( Diwali) सण तोंडावर आला आहे. त्यामुळे सण साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोनस ( Bonus) दिला जातो. कंपन्याना कोरोना काळात नुकसानीचा फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बोनसवरही संक्रात आली आहे. परंतु कोरोना काळात काम करणाऱ्या अत्यावश्यक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.

याविषयी माहिती देताना एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे ( Chandrakant Salunkhe) म्हणाले की, दिवाळी देशातील मोठा सण आहे. तो उत्साहात साजरा केला जातो. विविध खाद्यपदार्थ तसेच कपड्याची, वस्तूंची खरेदी केली जाते. त्यासाठी कंपनीकडून बोनस दिला जातो. लहान कंपन्या एक पगार तर मोठ्या कंपन्या दोन पगार देतात. तर काही टक्केवारीनुसार देतात. ज्या कंपन्या बोनस देणार आहेत त्या साधारण दिवाळीच्या एक आठवडा आधी बोनस देतील. त्यामुळे या दिवाळीमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे.

४० टक्के उद्योग सुरू
मुंबईत सध्या १० लाख लहान मोठ्या उद्योग ( Business) आहेत. सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, टेलिकम्युनिकेशन, फूड सेक्टरशी संबंधित कंपन्या,मुंबईतील जे लघु उद्योग, लेबर वर्कचे काम करणारे, गारमेंटचे काम करणारे हे जे घरगुती उद्योग, हॉटेल क्षेत्र सुरू झाले आहे. मात्र यामध्ये कोरोनाचा फटका बसल्याने अनेक कंपन्या अजूनही सुरु झालेल्या नाहीत.यापैकी केवळ ४० टक्के कंपन्या सुरु झाल्या आहेत.दरम्यान, कोरोनात पगार मिळाले नाहीत, नोकऱ्या गेल्या. बोनस काय मिळेल हा प्रश्न आहे.. तसे पाहिले तर कायद्यानुसार बोनस खुप कमी लोकांना मिळतो.

कोरोनात जे उद्योग सुरू आहेत त्यांना बोनस मिळेल पण बहुतांश कामगारांना बोनसचा लाभ मिळतनसल्याची माहिती कामगार नेते विश्वास उटगी ( Vishwas Utgi) यांनी दिली आहे. त्याचबरोबर डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे( Milind Kamble) यांनी याविषयी बोलताना सांगितले,कोरोना काळात अनेक उद्योग बंद होते त्यामुळे यंदा बऱ्याच कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता नाही. कामगारांनाही परिस्थितीची जाणिव आहे त्यामुळे ते देखील बोनस साठी आडून बसणार नाहीत. हे वर्ष केवळ जगण्याचे आणि जगवण्याचे वर्ष आहे. त्यामुळे इतर कंपन्या काय निर्णय घेतात याकडे देखील कामगारांचे लक्ष लागून आहे.