पुतळ्यांपेक्षा विचारांची उंची अधिक महत्वाची

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- महात्मा गांधी आणि समकालीन महापुरुष यांच्यात वैचारिक मतभिन्नता असली, तरी परस्परांत प्रेमाचा ओलावा होता. एकमेकांप्रती आदरभाव होता. आज वैचारिक मतभिन्नतेऐवजी व्यक्तीद्वेषच अधिक दिसतो. पुतळे उभारून एकमेकांवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. पण पुतळ्यांच्या उंचीपेक्षाही वैचारिक उंची अधिक महत्वाची असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हासदादा पवार बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.

कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्‍ववर सभागृहात आयोजिलेल्या या प्रकाशन सोहळ्याला प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे, बार्शी येथील प्रा. रुपाली नारकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस. परशुरामन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, लेखक प्रकाश बुरटे, प्रा. डी.पी.आपटे व लोकशाही समंजस संवादचे संपादक अरुण खोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले, गांधींच्या आयुष्यात अहंकाराला महत्त्व नव्हते. त्यांच्या विचारांनी, दर्शनाने अनेकांना प्रेरणा मिळत असे. त्यांच्या नजरेत एक सामर्थ्य होते, ते समोरच्याला प्रभावित करीत असे. त्यांनी नेहमी सत्य आणि अहिंसा याचा पुरस्कार केला. आज जिथे सत्य आणि अहिंसा आहे, तिथे गांधींची भेट झाल्याशिवाय राहत नाही. गांधींनी नेहमी हिंदू असल्याचा अभिमान बाळगला. मात्र इतर धर्माचा आणि भावनेचा आदर त्यांनी केला. शोषित, वंचित, दबलेल्या भारतीय घटकांचे गांधींनी प्रतिनिधित्व केले. अनेक विदेशी लोक गांधींना प्रेरणास्रोत मानतात. १२० पेक्षाही जास्त देशात गांधी विविध स्वरूपात भेटतात. सहनशील, विनयशील गांधी पुन्हा पुन्हा भेटत राहावेत. त्यांच्या विचारांचे आचरण हीच त्यांना आदरांजली ठरेल.

डॉ. कमलादेवी आवटे म्हणाल्या, गांधी अभ्यासताना प्रत्येक ठिकाणी वेगळ्या रूपात भेटतात. कोणाला ते सहनशील, अहिंसावादी वाटतात. कोणाला दिशा देणारे, तर कोणाला स्वातंत्र्य संग्राम उभा करणारे दिसतात. ग्रामीण भागातले गांधी, साधेपणा जपलेले गांधी अधिक भावतात. लोक त्यांच्याकडे अशक्त शरीरयष्टीचा; पण सशक्त विचारांचा महात्मा म्हणून बघतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून, विचारांतून आपल्याला प्रेरणा मिळते.

डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, महात्मा गांधी हे भारतीय संस्कृती, परंपरा तत्वज्ञान याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. परदेशात भारताची ओळख महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांचा देश अशी आहे. गांधीचे तत्वज्ञान आपण अभ्यासायला हवे. संयुक्त राष्ट्र संघाने महात्मा गांधींचा जन्मदिवस अहिंसा दिवस म्हणून घोषित केला, यावरून जागतिक स्तरावरील गांधीजींचे स्थान लक्षात येते.

डॉ. एस. एन. पठाण, प्रा. रुपाली नारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अरुण खोरे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शांतकुमार मोरे यांनी आभार मानले.