विचारवंत खूप; पण आचरण करणारे किती ? प्रबोधन महोत्सवात उल्हास पवार यांचा प्रश्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काळाबरोबर स्वत:चेही परिवर्तन व्हावे अशी प्रबोधनकार ठाकरे यांची आयुष्यभर भूमिका होती. त्यांच्या लिखाणात आक्रमकपणा, कणखरपणा होता. अंधश्रद्धेद्वारे होणारे शोषण थांबविण्यासाठी त्यांनी व्यवस्थेवर अनेक प्रहार केले; आसूड ओढले. प्रबोधनकार जे बोलत ते आचरणात आणत. आजच्या काळात विचारवंत खूप आहेत पण आचारण करणारे किती आहेत असा प्रश्न ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी केला. शत्रूशी दगलबाजीनेच वागणे हाच राष्ट्रधर्म आहे, अशीच प्रबोधनकारांची नीती होती अशी टिप्पणीही त्यांनी केली.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ‘प्रबोधन’ या विषयावर पवार बोलत होते. तत्पूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांनी भोर येथे केलेल्या ‘दगलबाज शिवाजी’ या व्याख्यानातील काही भागाचे अभिवाचन अभिनेते शंतनू मोघे यांनी केले. ‘प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान सुरू असतानाच सुरेश राऊत यांनी प्रबोधनकारांची शिल्पाकृती साकारली. प्रबोधन आणि कलाकृती असा दुहेरी योग यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभवला. अशा पद्धतीने प्रबोधनकारांचे शिल्प पहिल्यांदाच साकारण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राऊत हे शिवसेनाप्रमुखांचे शिल्प साकारणार आहेत.

उल्हास पवार म्हणाले, प्रबोधनकारांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. समाजसुधारणेसाठी महाराष्ट्रात जशी चळवळ उभी राहिली तशी चळवळ उत्तरेत दिसत नाही. महाराष्ट्राप्रमाणे दक्षिणेत समाजसुधारणेच्या चळवळी झाल्या. समाजातील विषमता मोडण्यासाठी प्रबोधनकारांनी मोठी चळवळ उभी केली. प्रबोधनाबरोबच त्यांनी लेखणीद्वारे सुधारणेचेे तत्त्व मांडले तसेच त्यांच्या लेखनात गोडी आणि दु:खही होते. प्रबोधनकारांच्या विचारधारेनेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जगले.

संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी यांनी स्वागत केले.