देहूगावात इंद्रायणीतील हजारो मासे मृत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – इंद्रायणी नदीतील वाढते जलप्रदूषण आणि खालावणारी पाण्याची पातळी यामुळे देहूगाव येथील पात्रात हजारो मृत मासे आढळून आले.

रविवारी सकाळी बाराच्या सुमारास देहूगावमधील गोपाळपुरा येथील इंद्रायणी नदीपात्रात अचानक हजारो मृतमासे पाण्यावर तरंगू लागले. फ्रेंडस ऑफ नेचरच्या सदस्यांनी पाण्यात जाऊन बघितले असता मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आला. नागरिकांनी सर्व मासे पाण्यातून बाहेर काढले. सुमारे दोन हजार मृतमासे नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.

नदीपात्रातून बाहेर काढलेल्या मृत माशांचा खच पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी अपवाद वगळता कुणीही पुढे येत नाही. देहूगावात संत तुकाराम महाराज मंदिर आहे. त्यामुळे या गावाला तीर्थक्षेत्राचा बहुमान मिळाला.

दरवर्षी लाखो भाविक भक्त देहूगावात संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला येतात. दर्शन घेण्यापूर्वी इंद्रायणी नदीत अंघोळ करतात. तसेच या नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र, हे पाणी अत्यंत दूषित झाले आहे.