Coronavirus : अमेरिकेतील हजारो भारतीयांना ‘कोरोना’चा संसर्ग ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त अमेरिकेत असलेल्या अनेक भारतीय लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यातील काहीजणांचा मृत्यूही झाला आहे. अमेरिकेत 40 लाख भारतीय वास्तव्यास असून त्यांच्या पैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारतीय लोकांचा कोरानाचा निश्चित आकडा समजलेला नाही, पण खासगी समाजमाध्यम गटांवरून जी माहिती मिळत आहे त्यावरून न्यूयॉर्क व न्यूजर्सीत अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. दोन राज्यात भारतीय अमेरिकी लोकांची संख्या अधिक असून या राज्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सोमवारी 1 लाख 70 हजार जणांच्या चाचण्या या दोन राज्यात करण्यात आल्या असून या दोन राज्यातील मृतांची संख्या 5 हजार 700 आहे. अनेक भारतीयांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन या संस्थेच्या माजी अध्यक्षांची चाचणी सकारात्मक आली आहे. भारतीय अमेरिकी पत्रकार ब्रह्म कुचीभोटला यांचा सोमवारी रात्री न्यूयॉर्क रुग्णालयात मृत्यू झाला.

मेरीलँड, व्हर्जिनियात अनेक भारतीयांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. सेवा इंटरनॅशनलने तेथे भारतीयांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. भारतीय अमेरिकी लोकांनी ह्यूस्टन येथे मृत्यूशी झुंज देणारे आयटी व्यावसायिक रोहन बावडेकर यांच्या मदतीसाठी 2 लाख डॉलर्स जमा केले आहेत. त्यांची पत्नी व तीन मुले यांना करोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे सिलिकॉन व्हॅलीत भारतीय अमेरिकी आयटी व्यावसायिक अभियंत्यास करोनाची लागण झाली असून त्याच्या कुटुंबातील सर्वाच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.