PMC बँकेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा ?, ‘ही’ ज्वेलर्स कंपनी कोट्यावधी रूपये घेऊन ‘फरार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब अ‍ॅन्ड महाराष्ट्र को-ऑप. (पीएमसी) बँक घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय बळावत आहे. राज्यातील एका ज्वेलर्सचं स्टोअर अचानक बंद झाल्यानं हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान, ग्राहकांनी ज्वेलर्सच्या दोन योजनांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासुन ज्वेलर्स स्टोअरचा मालक स्टोर बंद करून फरार झाला आहे. पोलिस पथक गुडविन स्टोअरचे मालक सुनील कुमार तसेच सुधीश कुमार यांच्या डोंबिवली येथील घरी पोहचल्यावर ते बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर परिसरातील ज्वेलर्सचे शोरूम सीलबंद करण्यात आले आहेत. सुनील तसेच सुधीश हे दोघेही केरळचे रहिवाशी आहेत. त्यांची मुंबई आणि पुण्यात किमान 13 आऊटलेट आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गुडविन ग्रुपच्या वेबसाईटनुसार सुनील कुमार कंपनीचे चेअरमन असून सुधीश कुमार हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

goodwin
गुडविन ज्वेलर्स स्टोअरच्या लॉन्चिंगच्या वेळी बॉलिवूडचे कलाकार (फाईल फोटो – सन 2016)


कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक
गुडविन ज्वेलर्सच्या योजनांमध्ये 2 हजार रूपयांपासुन ते 50 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करण्यात आल्याचा दावा गुंतवणूकदारांनी केला आहे. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार ही रक्कम कोटयावधी रूपयांपर्यंत असू शकते. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.पी. आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडविन ज्वेलर्स कंपनीच्या मालकांवर तसेच एरिया मॅनेजर मनिष कुंडी यांच्याविरूघ्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास चालु आहे. आत्तापर्यंत केवळ डोंबिवलीच्या सुमारे 250 लोकांनी पोलिसांशी संपर्क केला आहे. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आणि केरळात 12 तर दुबईत 2 शाखा
गुडविन ज्वेलर्सचे एकूण 12 आऊटलेट आहेत. त्यामध्ये वाशी, ठाणे, चेंबूर, वसई, अंबरनाथ, मिरा रोड, डोंबिवली, पिंपरी, चिंचवड, बंडगार्डन, विश्रांतवाडी येथील आऊटलेटचा समावेश आहे. केरळामध्ये थिसूर येथे देखील या ज्वेलर्सची शाखा आहे. दरम्यान, पुण्यातील सर्व आऊटलेटमध्ये आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे कोणाशी संपर्क देखील हाऊ शकला नाही. गुडविन ज्वेलर्सच्या दुबईमध्ये देखील 2 शाखा आहेत. महाराष्ट्रातील या सर्व शाखा दि. 22 ऑक्टोबरपासुन बंद आहेत.

गुंतवणूकदारांची गुडविन आऊटलेट बाहेर तोबा गर्दी
गुडविन ज्वेलर्सचे राज्यातील सर्वच्या सर्व आऊटलेट दि. 22 ऑक्टोबरपासुन बंद आहेत. त्याची चाहूल लागल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी गुडविन ज्वेलर्सच्या आऊटलेटला भेट दिली. त्यावेळी त्यांना आऊटलेट बंद असल्याचे पहावयास मिळाले. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील सर्वच्या सर्व आऊटलेटच्या बाहेर गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणावर गर्दी करण्यास सुरवात केली.

जादा परताव्याचे आमिष
अलिकडील काळात जादा परताव्याच्या आमिषाने मोठया प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे पहावयास मिळते. काही तथाकथित ज्वेलर्स आमुक रक्कम गुंतवणूक केल्यास त्यावर जादा परताव्याचे आमिष दाखवतात आणि सर्वसामान्य जनतेकडून गुंतवणूक स्विकारतात. गुडविन ज्वेलर्सने देखील अशाच प्रकारे गुंतवणूक स्विकारून लोकांना गंडा घातला असल्याचे फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

व्हाइस मॅसेजमध्ये गुंतवणूक सुरक्षित असल्याचं सांगितलं
गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील तसेच सुधीश हे गेल्या 22 वर्षापासुन सराफी व्यावसायात आहेत. एका व्हाइस मॅसेजमध्ये गुंतवणूकदारांचे सर्व पैसे सुरक्षित असल्याचं गुडविनचे चेअरमन सांगतात असं बोललं जातं. जे काही झालं आहे ते 3 वर्षापुर्वी सुरू झालं असून एका चुकीच्या कॅम्पेनचं हे सर्व झालं आहे. आमचं कुटूंब संकटात असून त्यामुळेच आमच्या व्यापारावर याचा परिणाम झत्तला आहे. यासाठी आम्ही युक्ती शोधत आहोत असं त्या व्हाइस मॅसेजमध्ये असल्याचं सांंगितलं जात आहे.