पगार न दिल्याने iPhone Plant मध्ये तोडफोड, कंपनीला 437 कोटी रुपयांचे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कर्नाटकच्या कोलारमध्ये असलेल्या आयफोन बनविणाऱ्या फॅक्टरीच्या तोडफोडीत सुमारे 437 कोटी रुपयांचे नुकसान झाले. हा कारखाना तैवानच्या विस्ट्रोन कॉर्पोरेशनद्वारे चालविला जात आहे. विस्ट्रोन कॉर्पोरेशनने तक्रारीत सांगितले की, कर्मचार्‍यांनी केलेल्या तोडफोडीत कंपनीला सुमारे 437 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हिंसाचारादरम्यान चोरले आयफोन

दरम्यान, कंपनीचे कर्मचारी पगार न मिळाल्याने नाराज होते आणि शनिवारी त्यांनी कारखान्यात जोरदार गोंधळ घातला. विस्ट्रोन कॉर्पोरेशनने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हजारो आयफोन हिंसाचाराच्या वेळी चोरीला गेले, हे नुकसानीचे सर्वात मोठे कारण आहे. याव्यतिरिक्त, कामगारांनी असेंब्ली लाइन आणि इतर उपकरणांचे नुकसान केले.

3 महिन्यांपासून सुरू आहे वाद

या हिंसाचाराचा निषेध करत कर्नाटकचे कामगार मंत्री शिवाराम हेब्बर म्हणाले की, कंपनीचे नुकसान अस्वीकार्य आहे. व्हिस्ट्रॉन आणि कंत्राटी कामगारांमधील वाद तीन महिन्यांपासून सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. कर्नाटकचे कामगार मंत्री शिवाराम हेब्बर म्हणाले की, कोस्टर युनिटसाठी विस्ट्रॉनने सहा सहाय्यक कंपन्यांशी करार करून 8,900 लोकांना काम दिले. याखेरीज कंपनीत 1200 कायमस्वरुपी कर्मचारी आहेत.

गैरसमजांमुळे भडकला हिंसाचार

राज्याचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले की, व्हिस्ट्रॉन आणि कर्मचारी यांच्यातील गैरसमजांमुळे हा हिंसाचार उफाळला. ते म्हणाले की आम्हाला कळले आहे की कंपनीने कंत्राटदारांना पैसे दिले होते, परंतु त्यांनी कर्मचार्‍यांना देण्यास उशीर केला. मंत्री म्हणाले, ‘कामगार विभागाने विस्ट्रोनला नोटीस बजावली असून, फर्मला थकबाकी तीन दिवसात देण्यास सांगितले.’