‘झोमॅटो’, ‘स्विगी’चा हजारो रेस्टॉरंटला फटका… काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा घरचं किंवा हाॅस्टेलवर राहत असाल तर मेसचं जेवण खाऊन कंटाळा येतो म्हणून बाहेर जेवायला जायचा प्लॅन करतो. कधी कधी आपण आॅनलाईन आॅर्डर करून पण फूड मागवत असतो. यामध्येही वेगवेगळी अॅप्लिकेशन्स आणि कंपन्यांमध्ये चुरस सुरु असलेली दिसते. सध्या घरबसल्या अनेक गोष्टी मागवता येतात. जसं लोक आॅनलाईन शाॅपिंग करतात तसेच जेवण ही आॅनलाईन किंवा अॅपच्या माध्यमातून आॅर्डर करतात. ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’वरून जेवण मागवणं, हा हल्लीच्या जीवनशैलीचा जणू काही अविभाज्य भाग आहे. परंतु आता तु्म्ही या अॅपवरून जर काही आॅर्डर करणार असाल तर तुमचे हाॅटेलचे पर्याय कमी असल्याचे दिसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याच्या मानकांचे पालन न करणाऱ्यांना ‘झोमॅटो’, ‘स्विगी’सह ‘फूडपांडा’, ‘उबेर इट्‌स’ या ‘फूड ऍग्रिगेटर’ने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

देशभरातील दहा हजारांहून अधिक हॉटेल व्यावसायिक आता या दोन ऍपवर उपलब्ध नसतील अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे  यापुढे ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’वरून काही मागवणार असाल, तर कदाचित तुमचे हॉटेलचे पर्याय कमी असतील, यासाठी मनाची तयारी ठेवावी लागणार आहे.

दरम्यान अन्न सुरक्षेसाठीच्या कायद्यातील मानकांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्सवर बंदी घालावी असे आदेश सरकारकडून देण्यात आले होते. याच आदेशाचे पालन करत आता  ‘स्विगी’ने त्यांच्या यादीतून सर्वाधिक 4,000 हॉटेल्स वगळली. त्यापाठोपाठ झोमॅटो (2,500), उबेरइट्‌स (2,00) आणि फूडपांडा (1,800) या फूड ऍग्रिगेटर्सनेही कारवाई केली आहे. त्यामुळे या सुरक्षेच्या निकषांचे पालन न करणारी हॉटेल्स आता ‘झोमॅटो’, ‘स्विगी’वर उपलब्ध नसतील असे दिसत आहे.

महत्त्वाचे म्हणजे ‘झोमॅटो’ची डिलिव्हरी करणाऱ्याने रस्त्यातच अन्न उष्टे केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अन्न घरपोच देण्याची ही सगळी प्रक्रिया चर्चेत आली होती. त्यानंतर ‘फूड ऍग्रिगेटर’ कंपन्यांनी कडक धोरण स्वीकारले असल्याचे दिसत आहे.

‘झोमॅटो’ची डिलिव्हरी करणाऱ्याने रस्त्यातच अन्न उष्टे केले होते व्हिडीआे झाला होता व्हायरल

एक व्हिडीआे असा समोर आला होता ज्यात एक व्यक्ती फॉईल पेपरच्या बॉक्समधील पदार्थ खात असल्याचे दिसत आहे. व्हिडियोमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा व्यक्ती झोमॅटोचा टीशर्ट घालून आणि झोमॅटोची बॅग घेऊन स्कूटरवर बसला आहे. बॉक्समधील पदार्थ खाल्ल्यानंतर हा बॉक्स होता त्याचप्रमाणे नीट लावून तो ठेऊन देतो आणि आणखी एक बॉक्स काढून पुन्हा त्यातील पदार्थ खायला सुरुवात करतो. मग त्यातलेही चार घास खातो आणि तो बॉक्सही ठेऊन देतो असे स्पष्ट दिसत  आहे. महत्त्वाचे म्हणजे सोशल मिडियावर अगदी कमी वेळात हा व्हिडियो व्हायरल झाला होता इतकेच नाही तर त्याबाबत बरीच चर्चाही रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.