Coronavirus Impact : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 14000 लघु उद्योग ‘अडचणीत’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वाहन उद्योगाच्या वाढीला ब्रेक बसल्याने लघु उद्योजकांच्या ऑर्डर्समध्येही 20 टक्क्यांची घट झाली आहे. परिणामी वाहन उद्योग श्रृंखलेतील अविभाज्य भाग असलेल्या या उद्योगाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड भागातील अंदाजे 14 हजार लघु व मध्यम उद्योगांसाठी आर्थिक मंदीची भीती आहे. संबंधित कंपन्या वार्षिक अंदाजे 5 लाख कर्मचार्यांना रोजगार देतात. मात्र, आता याच कंपन्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने कर्मचारी कपात करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरलेला नाही.

औद्योगिक भागात अनेक दशकांपासून ऑटोमोबाईल ओरिजिनल इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरर्स (ओईएम) या लघुउद्योगांवर अवलंबून आहेत. त्याशिवाय या भागातील टाटा मोटर्स, बजाज, फोक्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या प्रकल्पांमध्येही या लघु उद्योगांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, रांजणगाव आणि पुणे जिल्ह्यातील इतर उद्योजकांनी अनुकूल वातावरण निर्मिती केले आहे. त्यामुळे दर्जेदार मनुष्यबळ तयार होऊन व्यवसायवृद्धी होण्यासही मदत झाली. कालांतराने त्यांनी इतरांना उपकराचे कंत्राट दिल्याने मूल्य शृंखला पूर्ण झाली.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत वाहन उद्योगातील जोरदार वाढ लक्षात घेऊन, या भागातील एमएसएमई युनिट्सना क्षमता वाढवण्यासाठी संस्थात्मक वित्तपुरवठा केला गेला. उच्च उत्पादन आणि कामगारांना ओव्हरटाईम मिळवण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी बऱ्याच ओईएम युनिट्सनी तीन शिफ्ट्समध्येही काम केले. मात्र जानेवारीपासून छोट्या कंपन्यांना मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. कारण ओईएम विक्रीशी झगडत असताना, त्याची झळ विक्रेते आणि उपविक्रेत्यांनाही बसत आहे. या विक्रेते आणि उपविक्रेत्यांकडे दिलेल्या ऑर्डर्सचे प्रमाणही घटले आहे. मंदीमुळे कंपन्यांनी ओव्हरटाईम पूर्णपणे बंद केला. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांची निवड प्रक्रियाही कंपन्यांनी थांबवली आहे.