आश्चर्य ! ‘या’ तंत्राने कोणतीही वस्तू बनेल मूळ आकारापेक्षा १००० पट लहान

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल परंतु हे खरे आहे की, एखादी वस्तू तिच्या आकारापेक्षा हजारपटीने लहान बनवण्याचे तंत्र शोधण्यात आले आहे. ‘हनी आय श्रंक द किडस्’ नावाचा एक हॉलीवूडपट एकेकाळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटात एक संशोधक इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक श्रिंकिंग मशिन बनवतो व चुकून त्याच्यामुळे त्याची व शेजार्‍यांची मुलं मुंगीपेक्षाही छोट्या आकाराची बनतात, असे यामध्ये कथानक होते.  1989 मध्ये हा चित्रपट आला होता. परंत अशा प्रकारचे  सायन्स फिक्शन कधी खरे होईल असा कधीच कोणाला वाटले नसेल. परंतु आता माणूस नव्हे तर एखादी वस्तू तिच्या आकारापेक्षा हजारपटीने लहान बनवण्याचे तंत्र शोधण्यात आल्याचे समोर आले आहे.
या तंत्राने वस्तू इतकी छोटी होईल की, ती पाहण्यासाठी लेसर मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल. मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, त्यांनी कोणत्याही वस्तूला नॅनोस्केलपर्यंत छोटे बनवण्याचे तंत्र शोधले आहे. संशोधकांनी या तंत्राला ‘इम्पॉल्शन फॅब्रिकेशन’ असे नाव दिले आहे. हे तंत्र कोणत्याही वस्तूला लागू होऊ शकते. जगभरातील कोणतीही वस्तू या तंत्राने वास्तविक आकारापेक्षा एक हजार पटीने अधिक लहान करता येऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे.  छोट्या मायक्रोफोनपासून सेलफोनच्या लेन्सपर्यंत आणि छोट्या आकाराच्या रोबोमध्येही हे तंत्र वापरता येईल.
कसे काम करते हे तंत्र ?
या तंत्राचे एडवर्ड बॉयडन हे प्रमुख संशोधक आहेत. त्यांनी याबाबत माहिती दिली आहे की हे तंत्र कसे काम करते. हे काम थ्रीडीमध्ये पेनने केले जाते. त्यानंतर यामध्ये कोणतेही मटेरियल म्हणजे धातू, डीएनए आणि छोटे क्‍वाँटम डॉट पार्टिकल्स ठेवून या रचनेला छोट्या आकारात संकुुचित केले जाऊ शकते. हे बर्‍याच अंशी फिल्म फोटोग्राफीसारखेच तंत्र आहे. यामुळे भविष्यात अनेक कामे सुकर होऊ शकतील, असे संशोधकांना वाटते. त्यामुळे भविष्यात हे खूपच फायदेशीर ठरणार आहे हे मात्र नक्की.