शिक्षक भरती पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनाना ऑनलाईन – मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर शिक्षक भरती लांबणीवर पडली होती. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर तयार करण्यात आलेला भारतीचा रेस्टार तक्ता पुन्हा बदलावा लागला होता. त्यातच आता राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळाला खरा परंतु यामुळे आधीच लांबणीवर गेलेली शिक्षक भरती आता पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची अशी भीती वर्तवण्यात येत आहे. या गोष्टीमुळे शिक्षक भरतीसाठीच्या उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात तब्बल १० वर्षांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. सदर भरतीबाबत येत्या काही दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे असेही समजत आहे. राज्यात २००८ नंतर शिक्षक भरती झाली नाही. भरतीच्या जाहिरातीत भरतीची पूर्ण प्रक्रिया देण्यात येणार आहे. आता सवर्ण प्रवर्गात मोडणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये असणारे १० टक्के आरक्षण लागू केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता भारतीचा रेस्टार तक्ता पुन्हा बदलावा लागतो की काय याबाबत उमेदवारांत संभ्रम आहे. दरम्यान सवर्ण आरक्षणाचा तक्ताच बाजूला ठेवून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, असा पर्याय शिक्षण आयुक्तांना आपण दिल्याची माहिती सामान्य अभियोग्यता कल्पेश ठाकरे यांनी दिली.

अद्याप जागांची निश्चिती नाही

शिक्षक भरती नेमकी किती जागांसाठी होणार आहे हे आता गुलदस्त्यात आहे अशी माहिती समोर आली आहे. २४ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, खासगी शाळांच्या शिक्षक भरतीसाठी उमेदवार मात्र शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहेत. परंतु ही भरती मात्र त्यांनी घेतलेल्या मुलाखतीनुसार होणार आहे. दरम्यान शिक्षण विभागाकडून किती उमेदवार मुलाखतींसाठी द्यायचे हे अद्याप निश्चित नसून त्यावर चर्चा सुरू असल्याचे समजत आहे. त्यामुळे नेमकी किती जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे हे काही स्पष्ट झालेले नाही.