फडणवीसांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, गिरीश महाजनांकडे मागितली होती 1 कोटीची खंडणी

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी फोनवरून देण्यात आली आहे. .या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामनेर येथे काल (ता.१३) रोजी महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन तर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. या वेळी महाजन यांचे स्विय सहायक दीपक तायडे यांना फोन आला. ती व्यक्ती हिंदीत बोलत होती. “गिरीश महाजन यांना एक करोड रुपये देण्याचे सांग अथवा बॉम्बने उडवून देऊ. त्यानंतर काही वेळाने मोबाईलवर मॅसेज केला. त्यातही हाच मजकूर होता, सायंकाळी पाच वाजता ब्लास्ट करण्याची धमकीही त्याने दिली होती. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीही तायडे यांनी दिली.

भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांना काल रात्री दहा वेळा धमकीचे कॉल आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी शेलार यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. शेलार यांना धमकी देणाऱ्या दोघांना काल मुंब्र्यातून अटक केली आहे.

अभिनेत्री कंगना राणावतवर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनाही आधी धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कथित हस्तकाला दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोलकत्यातून अटक केली होती. पलाश बोस असे त्या आरोपीचे नाव होते.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमक्यांचे कॉल आले होते. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांना धमक्यांचे कॉल आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.