अमित शाह आणि योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी; CRPF सह यंत्रणा सतर्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. CRPF च्या मुंबईतील मुख्यालयात यासंदर्भात एक ईमेल आल्याचे सांगितले जात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार,CRPF च्या मुख्य कार्यालयाला मंगळवारी (दि. 6) हा ईमेल आला. या मेलमध्ये शहा आणि योगींना येत्या काळात जीवे मारण्यात येईल, असे म्हटले आहे. या ईमेलनंतर CRPF च्या कार्य़ालयात खळबळ उडाली आहे.

CRPF जवान आणि अन्य यंत्रणा सतर्क झाल्या असून धमकी देणा-याचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कोणत्या तरी धार्मिक स्थळी हल्ला करण्यात येईल, असा ईमेल CRPF च्या मुख्य कार्यालयाला आला. शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याचा ईमेल काही दिवसांपूर्वी आला होता.

याबाबत अन्य तपास यंत्रणा, संस्थाना माहिती दिली होती, अशी माहिती CRPF च्या सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीही अमित शहा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वी अनेकदा जीेवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.