पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सार्वजनिक रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने पोलीस हवालदारास धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोथरुड येथे घडला आहे. हा प्रकार कोथरुड येथील लक्ष्मीनगर झोपडपट्टी येथील सार्वजनिक रस्त्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमरास घडला असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

शेखर लहु लोणारे (वय-२७), गणेश सतिश राऊत (वय-२३), मयुर विश्वनाथ कांबळे (वय-२३), राजु महादेव विटे (वय-३९), सागर कुंडलिक नाईक (वय-२७), रोहीत बाळासाहेब पारवे (वय-२५ सर्व रा. कोथरुड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोहन तानाजी कडोलकर (वय-४७) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलीस हवालदार मोहन कडोलकर हे पायी गस्त घालत असताना लक्ष्मीनगर झोपडपट्टी येथील सार्वजनिक रस्त्यावर शेखर लोणारे हा लघुशंका करित होता. त्यावेळी त्याचे इतर साथिदार सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडा ओरडा करित होते. पोलीस हवालदार मोहन कडोलकर यांनी त्यांना हटकले असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली.

तसेच इतर साथिदारांना बोलवून कडोलकर यांच्याशी वाद घालून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक देशमुख करित आहेत.