पुण्यात अल्पवयीन मुलीला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – एका अल्पवयीन मुलीला रस्त्यामध्ये अडवून ‘कोणासोबत बोलायचे नाही, बोललीस तर तोंडावर अ‍ॅसिड फेकेन’ अशी धमकी देणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीने हा सर्व प्रकार घरात सांगितल्यानंतर उघडकीस आला. घरच्यांनी तरुणाला पकडून स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी (दि.२६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुना कॉलेज ते शाहु बसस्थानका दरम्यान घडला.

इस्माईल लाल शेख (वय-२९ रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग आणि पास्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना तिची छेड काढत होता. हा प्रकार मागील पंधार दिवसांपासून सुरु होता. मात्र, घाबरलेल्या मुलीने या बाबत घरामध्ये कोणाला काही सांगितले नाही. बुधवारी पीडित मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला वाटेत अडवले. तिला कोणासोबत बोलायचे नाही असे सांगून बोलल्यास तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने घरी आल्यावर चुलत भाऊ आणि मामाला हा सर्व प्रकार सांगितला. भावाने आणि मामाने आरोपी पकडून स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.