हप्ता भरला नाही म्हणून ‘पत्नी’ला उचलून नेण्याची धमकी, ‘महिले’विरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जाचा हप्ता भरता येणार नाही, असे सांगताच फायनान्स कंपनीतील महिलेने चक्क शिवीगाळ करत पत्नीला उचलून नेण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार कासारवाडीत घडला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी बजाज फायनान्स कंपनीच्या श्रृती शहा या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लाखो रुपयांची वाहने घेतल्यानंतर एक दोन हप्ते थकल्यानंतर भर रस्त्यात गुंडांकडून ते वाहन जप्त करायचे आणि आपल्याच नातेवाईकांना किरकोळ किंमतीत त्याचा लिलाव करुन कर्ज घेतलेल्याला अक्षरश रस्त्यावर आणायचे, असे असंख्य प्रकार सध्या राजरोसपणे फायनान्स कंपन्यांकडून सुरु आहेत. शहर पोलीस दलाच्या आशिर्वादाने हे सर्व सुरु आहे. आता त्यांची मजल थेट पत्नीला उचलून नेण्याची धमकी देण्यापर्यंत पोहचली आहे.

याप्रकरणी प्रविण नानासाहेब साळवी (वय ४०, रा. रामराज्य प्लॅनेट, कासारवाडी) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रविण साळवी यांनी बजाज फायनान्सकडून वैयक्तिक कर्ज घेतले आहे. १८ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना एका श्रृती शहा यांनी फोन केला व आपण बजाज फायनान्स कंपनीकडून बोलत असल्याचे हिंदीमधून तुमचे पर्सनल लोनचे हप्ते भरा असे सांगितले. त्यावर साळवी यांनी आता भरता येणार नाही. आपल्याकडे ५ हजार रुपयेच आहेत. बाकीचे पुढच्या महिन्यात भरतो असे सांगितले. त्यावर श्रृती शहा यांनी साळवी यांना घाणेरडी शिवीगाळ करुन पत्नीला उचलून आणण्याची धमकी दिली. त्यानंतर साळवी यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिखरे अधिक तपास करीत आहेत.

Visit – policenama.com 

You might also like