DIG निशिकांत मोरे विनयभंग प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या सरकारी चालक पोलिसा विरोधात धमकीची तक्रार, प्रचंड ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे येथील एम टी विभागात कार्यरत असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करणारी तरुणी बेपत्ता झाल्याचे समोर आल्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी पोलीस चालकाने तरुणीच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

उद्धव ठाकरे यांचे सरकारी चालक पोलीस काँस्टेबल दिनकर साळवे यांच्याविरुद्ध ही धमकीची तक्रार तरुणीच्या वडिलांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या वडिलांनी ही तक्रार केली आहे. दिनकर साळवे हे २ ते ३ दिवस रजेवर होते. त्याकाळात तरुणीचे वडिल कोर्टात गेले असता तेथे दिनकर साळवे आले व त्यांनी मोरे यांच्याविरुद्धची केस मागे घेण्याची धमकी दिली असल्याचा दावा या तरुणीच्या वडिलांनी केला आहे. त्याचा व्हिडिओही काढला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तरुणीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी २६ डिसेंबरला पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे आणि दिनकर साळवे हे १५ वर्षापूर्वी नागपाडा येथे कार्यरत होते. त्यावेळेपासून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्री ११ वाजल्यापासून ही तरुणी बेपत्ता झाली आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करु नये. माझ्या आत्महत्येस डीआयजी जबाबदार असतील, अशी चिठ्ठी या तरुणीने लिहून ठेवली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला असून या प्रकरणी पनवेल न्यायालयात सुनावणी असताना दिनकर साळवे याने कोर्टात येऊन तिच्या वडिलांना गप्प बसण्याची धमकी देऊन मी सीएमचा चालक असल्याची सांगितले. त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. त्याची चौकशी केल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीवरील चालक असल्याचे आढळून आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/