‘मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात 6 गोळ्या घालेन’; राजकीय वातावरण तापलं

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(DhananjayMunde) यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी मुंडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणा-या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडून धमक्याचे फोन येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंडे विरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात 6 गोळ्या घालीन अशी धमकी आपल्याला आल्याचे सोमय्या यांनी मुंबई पोलिसांना सांगितले आहे. याबाबत सोमय्या यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पत्र दिले आहे.

मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे विरोधी पक्ष भाजपाने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने याबाबत संयमाची भूमिका घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ असे सांगत सावध पवित्रा घेतला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी मुंडेवर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र याबाबत सोमय्या यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. धमकी देणारे सर्वजण राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यात महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे यांचा समावेश आहे. तसेच रविवारी सकाळी साडे अकरा वाजता दोनदा धमकीचे फोन आले, सर्व 6 बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार, गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे फोन सुरूच आहे. पोलिसांना कळवून देखील कोणतीही कारवाई केली नाही. फक्त तक्रार नोंद केली आहे अशा शब्दात सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री बंगले लपवतात, तर त्यांचे मंत्री बायको लपवतात
मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवतात असा घणाघात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी करत 3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.