मथुरा, काशी विश्वनाथ मंदिरावर बाॅम्ब हल्याची धमकी

लखनऊ: वृत्तसंस्था

देशातील अनेक धार्मिक स्थळे व उत्तर प्रदेशमधील रेल्वे स्थानकांना बाॅम्बच्या साहय्याने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाने दिली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. ६,८ व १० जुन रोजी हे स्फोट घडवून आणण्यात येतील असे एका पत्राव्दारे लष्कर-ए-तोयबाने लिहले असुन, या पत्राची सत्यता पडताळण्यात येत आहे.

लष्करने दिलेल्या धमकीच्या पत्रानंतर आयबीने तात्काळ अॅलर्ट जारी केला आहे.उत्तर प्रदेश पोलीसही सतर्क झाले असून धार्मिक, पर्यटन आणि सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचं अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक आनंद कुमार यांनी सांगितलं.या पत्रावर लष्कर-ए-तोयबाचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर मौलाना अंबू शेख याचे हस्ताक्षर असुन, त्याबाबत सत्यता तपासण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बांके बिहारी मंदिर आणि श्रीकृष्ण जन्मभूमी रेल्वे स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत असून संशयितांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. वाराणासी प्रशासनानेही हाय अॅलर्ट जारी केला आहे. काश्मिरमध्ये भारतीय सैन्याच्या तळावर आज हल्ला केला आहे. त्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा ने घेतली आहे.