नगरमध्ये रंगला युद्धाचा थरार…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रणगाड्यांतून बंकरवर तोफांचा मारा, हेलिकॉप्टरने टेहाळणी करून त्यातून खाली उतरून शत्रूंचे बंकर उध्वस्त करणारे जवान, लक्ष्याचा अचूक वेध घेणारे सैनिक हे दृश्य कुठल्या युद्धभूमीवरील असल्याचे वाटेल. हे प्रत्यक्ष युद्धाचे वर्णन नसून, युद्ध प्रात्यक्षिकाचे आहे. नगरपासून काही अंतरावर असलेल्या के.के.रेंज येथे भारतीय लष्कराच्यावतीने युद्ध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळच्या सुमारास के.के. येथे उपस्थितांना तोफांची सलामी देऊन युद्ध प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली. त्यानंतर एकामागोमाग एक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. 800 मीटरपासून चार किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा रणगाड्यातील तोफांच्या माध्यमातून अचूक वेध घेतला होता. तसेच बंकर्स उध्वस्त केली जात होती. हेलिकॉप्टरच्या कसरतीनेही उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी व भारताच्या मित्रराष्ट्रांचे लष्करी प्रतिनिधी उपस्थित होते.

भारतीय बनावटीचे अर्जुन, रशियन बनावटीचे अजय या अत्याधुनिक सुसज्ज असे रणगाडे या युद्ध प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. प्रात्यक्षिकातील सहभागी रणगाड्यांची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगण्यात आली. रणगाड्यांमधून मारा करण्यासाठी कोणत्या तोफा व बुलेट वापरल्या जात होत्या, याची माहिती दिली जात होती.

शेवटी विशिष्ट टार्गेट ठरवून त्यावर हल्ल्याचा आदेश देण्यात आला. सुरुवातीला हेलिकॉप्टरमधून पाहणी करण्यात आली. काही वेळाने चालत्या हेलीकॉप्टरमधून काही लष्करी जवान खाली उतरले. त्यानंतर दोन दिशांतून रणगाडे आले. या रणगाड्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेत आक्रमण केले. शत्रूंचे बंकर जवळ येताच जवान रणगाडे व हेलिकॉप्टरमधून उतरले. त्यांनी काही क्षणात शत्रूंचे बंकर उध्वस्त केले. अचूकपणे ऑपरेशन पूर्ण करताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात सामर्थ्यवान लष्करी अधिकारी व जवानांचे कौतुक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us