इस्लामपुरात मुख्याधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी, राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेवकाविरोधात FIR

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाबाधित कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्याची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावरून राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट मुख्याधिकारी केबिनमध्ये घुसून मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अंगावर खुर्ची घेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. ’तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला व तुझ्या कुटुंबाला बघून घेतो’ अशी धमकी दिली. मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये पाच ते सात मिनिटे हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी मुख्याधिकारी पवार यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये मंगळवारी दुपारी नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या गाडीमधून दारू वाहतूक होत असल्याबाबत नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. ही बाब गंभीर असल्याने आणि पालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारी असल्याने संबंधित वाहनावरील ठेकेदारी कर्मचार्‍यांवर फौजदारी करण्याचे आदेश त्या मुकादमाला दिले होते. या प्रकारानंतर दुपारी दीडच्या सुमारास प्रभारी आरोग्य अधिकारी साहेबराव जाधव यांच्या मोबाईलवर नगरसेवक खंडेराव जाधव यांनी फोन केला. ते वाहन का धरून ठेवले आहे अशी विचारणा केली.

त्यावेळी साहेबराव जाधव यांनी त्या वाहनाबाबत नक्की काय प्रकार घडलाय ते माहीत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी अडीचच्या सुमारास मुख्याधिकार्‍यांना फोन करून आपण नक्की कशासाठी कार्यवाही करत आहात, अशी विचारणा केली. यावेळी पालिकेची प्रतिमा मलीन होत आहे, या प्रकरणात मी कोणत्याही नगरसेवकांचे नाव किंवा चोरटी दारू वाहतूक होत आहे याचा उल्लेख केलेला नाही.

त्यानंतर नगरसेवक खंडेराव जाधव मुख्याधिकारी यांच्या दालनात आले. चर्चा सुरू असताना त्यांनी ’तुम्हा सर्वांना दाखवतोच, उगाच माझे तोंड खवळू नका’ असे बोलल्यावर मुख्याधिकारी ’तुम्ही नक्की कोणाला काय दाखवणार आहात?’ असे विचारल्यावर चिडून त्यांनी ’ये बाई तुला मस्ती आली आहे’ असे म्हणून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. केबिनमधील खुर्ची उचलून ते मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर धावून गेले, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.