अनैतिक संबंधातून खून , बेपत्ता तरुणाचा 14 महिन्यांनी सापडला मृतदेह

कायगाव/औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मागील 14 महिन्यांपासून बेपत्ता (Missing) असणाऱ्या अंमळनेर येथील 29 वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी (दि.12) जेसीबीच्या (JCB) साह्याने उकरुन काढला. या तरुणाचा अनैतिक संबंधातून (Immoral relationship) खून (Murder) झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक (Arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमळनेर येथील गणेश दामोदर मिसाळ हा 5 ऑक्टोबर 2019 पासून बेपत्ता होता. गणेशचा पाच दिवस शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अखेर 10 ऑक्टोबर 2019 रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यापासून गंगापूर पोलीस या प्रकरणाचा शोध घेत होते.

दरम्यान, सचिन ज्ञानेश्वर पंडित आणि रवींद्र उर्फ प्पू कारभारी बुट्टे (दोघे रा. अंमळनेर, ता. गंगापूर) यांना ताब्यात घेतले. तपासामध्ये सचिन पंडित याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि मयत गणेश याला हे माहित होते. तसेच तो हे संबंध उघड करण्याची धमकी देत होता. याच कारणावरुन आरोपींनी कट रचून त्याचे अपहरण केले आणि दोरीने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह अंमळनेर शिवारातील पाडुरंग गाडे यांच्या शेतात पूरल्याची माहिती समोर आली.

याप्रकरणी पोलीस नाईक संदीप डमाळे यांनी फिर्याद दिली असून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, विजय भिल्ल, पोलीस नाईक संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकूटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रय गुंजाळ यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तंत्रशुध्द व कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.