पुणे तिथं काय उणे ! अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून पुण्यात दिवसभरात ३ तासात ३ ट्रॅप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लाचलुचपतप प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) गुरूवारी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात असे एकुण 3 तासात 3 ट्रॅप यशस्वी केले. दुपारी अडीच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान पुणे शहरात 2 ठिकाणी तर पुणे जिल्हयातील शिक्रापूर येथे एक अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप झाला. विशेष म्हणजे तिन्ही ट्रॅप हे पोलिस दलातील होते. एकाच दिवशी आणि अवघ्या 3 तासात 3 वेगवेगळया ठिकाणी ट्रॅप झाल्याने संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक सुहास नाडगौडा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे ट्रॅप यशस्वी केले. एकाच दिवशी 3 तासात 3 ट्रॅप यशस्वी होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप – 1 (वेळ : दुपारी 2.30 वाजता)
महिला भंगार व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी पुणे शहर आयुक्‍तालयातील वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराने एका खासगी व्यक्‍तीमार्फत 5 हजाराची लाच स्विकारली. 15 हजाराच्या लाचेची मागणी केल्यानंतर 5 हजार रूपयाची लाच देण्याचे ठरले होते. पोलिस हवालदार निसार मेहमुद खान (44, बक्‍कल नं. 2647) यांच्या सांगण्यावरून मेहंदि अजगर शेख (32, रा. हडपसर) याने महिला तक्रारदाराकडून 5 हजार रूपये स्विकारले आणि त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने दोघांना दुपारी अडीच वाजता रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप – 2 (वेळ : दुपारी 4 वाजता)
पुणे शहर पोलिस आयुक्‍तालयातील आस्थापना शाखेत कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपीकाने एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडे 3 हजाराच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने सहाय्यक निरीक्षकाने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदवली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालय परिसरात गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सापळयाचे आयोजन केले. वरिष्ठ लिपीक मनोज हरी काळे (52) यांना सरकारी पंचासमक्ष 3 हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. काळे यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अ‍ॅन्टी करप्शन ट्रॅप – 3 (वेळ : सायंकाळी 5.30 वाजता)
पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल बाबुराव कोळेकर (54) यांनी तक्रारदाराविरूध्द कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. लाचेची मागणी होत असल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने शिक्रापूर येथे सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रॅप रचला. त्यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक कोळेकर यांनी सरकारी पंचासमक्ष 20 हजार रूपयाची लाच स्विकारली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरूध्द शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.