खंडणी आणि फसवणूक प्रकरणातील फरारी आरटीआय कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटेसोबत फरार काळात फिरणार्‍या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणी आणि फसवणूक प्रकरणात फरार असणार्‍या आरटीआय कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटेसोबत फरार काळात असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच त्याला पळून जाण्यास मदत केल्याने पुणे पोलिसांनी तिघांना अटक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फरार आरोपीस सहारा देणं किंवा मदत करणं किती महागात पडत हे आज पुणे पोलिसांच्या कामगिरीने समोर आले आहे. पोलीस बर्‍हाटेचा शोध घेत असून, तो अद्याप सापडलेला नाही.

विशाल शिवाजी ढोरे (36), अस्लम मंजूर पठाण (24, दोघेही रा. मांजरी, हडपसर) आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (28, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
या प्रकरणात पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, संबंधित महिला, बडतर्फ पोलिस हवालदार शैलेश हरिभाऊ जगताप यांना जामीन मंजूर झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बर्‍हाटे (रा. लुल्लानगर चौक, कोंढवा), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाण वाडा पुणे) यांचा शोध सुरू आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी लागलीच महिला, पत्रकार जैन आणि बडतर्फ पोलीस जगताप याला अटक केली होती. पंरतु, आरटीआय कार्यकर्ता बराटे पसार झाला आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्याचा शोध युद्ध पातळीवर सुरू करण्यात आला आहे. मात्र अद्याप तरी तो पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान त्याची माहिती काढत असताना कोथरुड पोलिसांना बर्‍हाटेसोबत आणखी तिघेजण फिरत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांची माहिती काढली असता फरार काळात बर्‍हाटेसोबत हे तिघेजण दोन दिवस होते. त्या दोन दिवसात हे सासवड, हडपसर, सोलापूर परिसरात होते. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी या तिघांना आज पहाटे अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे मात्र शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.